Sat, Jul 20, 2019 10:39होमपेज › Solapur › भाजपच्या विरोधात काँग्रेस काढणार रथयात्रा

भाजपच्या विरोधात काँग्रेस काढणार रथयात्रा

Published On: Jan 06 2018 1:29AM | Last Updated: Jan 05 2018 8:59PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

भाजप सरकार लोकसभा व विधानसभा निवडणुकीत जनतेला खोटी आश्‍वासने देऊन सत्तेवर आले पण दिलेल्या एकाही आश्‍वासनाची पूर्तता त्यांनी केली नाही. यासाठी काँग्रेस पक्ष त्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात रथयात्रा काढत आहे, असे काँग्रेस पक्षाचे निरीक्षक मोहन जोशी यांनी सांगितले. 

यावेळी व्यासपीठावर आ. प्रणिती शिंदे, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष प्रकाश वाले, आ. सिद्धाराम म्हेेत्रे, आ. रामहरी रुपनवर, प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, धर्मा भोसले, अलका राठोड, निरीक्षक शिवाजीराव नीलकंठ, दिलीप माने, निर्मला ठोकळ, विश्‍वनाथ चाकोते, पक्षनेते चेतन नरोटे, संजय हेमगड्डी, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर, इंदुमती अलगोंडा-पाटील, गणेश डोंगरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुदीप चाकोते, सातलिंग शटगार आदी उपस्थित होते.

जोशी पुढे म्हणाले की, या रथयात्रेची सुरुवात कोल्हापूर येथून होणार असून ही रथयात्रा सोलापूर जिल्ह्यात तीन दिवस फिरणार आहे.   सभा, कॉर्नर सभा, रोड शो याद्वारे ही रथयात्रा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात फिरणार आहे. कार्यकर्त्यांनी या रथयात्रेचे स्वागत मोठ्या प्रमाणात करून यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत. सध्या काँग्रेस पक्षास चांगले दिवस येत आहेत. त्यातून परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. याचा फायदा आपण घेतला पाहिजे. गुजरात राज्यात झालेल्या निवडणुकीत पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षास चांगले यश मिळाले आहे.

जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले की, सध्या काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे. येणारा काळ हा काँग्रेस पक्षाचाच आहे. यासाठी आपण या रथयात्रेद्वारे पक्षाने केलेले काम लोकांपर्यंत पोहचवूया व रथयात्रेचे भव्य स्वागत करूया, असे ते म्हणाले.

माजी आमदार दिलीप माने म्हणाले की, काँग्रेस पक्षाने यापूर्वी संघर्ष यात्रा काढली होती. त्यामुळे भाजप सरकारला शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्यास भाग पाडले होते. आज परिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत, परिस्थिती बदलत आहे, याचा फायदा काँग्रेस पक्षाने घेतला पाहिजे.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश वाले आपल्या आभार प्रदर्शनात म्हणाले की, काँग्रेस पक्षाने काढलेल्या रथयात्रेला चांगला प्रतिसाद मिळेल,  असे आश्‍वासन दिले. पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.