होमपेज › Solapur › धुळा कोळेकरचा मुलगा पी.एस.आय.

धुळा कोळेकरचा मुलगा पी.एस.आय.

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 9:35PMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

धुळा कोळेकर म्हटलं की केवळ पोलीस खात्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनमानसाला हादरवून सोडणार्‍या पोलीस कॉन्स्टेबलचा चेहरा समोर येतो. दोन वरिष्ठ अधिकार्‍यांना गोळ्या खालून खून करणार्‍या धुळाचा मुलगा चक्क पोलिस उपनिरीक्षक झाला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत धुळाचा मुलगा रणजित कोळेकर याने यशाचा झेंडा फडकावला आहे आणि वडिलांच्या वर्दीवर लागलेला गुन्हेगारी डाग पुसण्यासाठी पोलिस दलाची वाट धरली आहे. विशेष म्हणजे धुळा कोळेकरचा एक मुलगा पालघर येते पोलिस दलात कार्यरत आहे तर आता दुसरा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाला आहे.

धुळा कोळेकर या पोलिस पोलिस कॉन्स्टेबलने 2002 साली नोकरीतील ताण, तणावाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून पंढरपूर येथे दोन वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना गोळ्या घालून ठार केले होते. तर अन्य एक वरिष्ठ पोलिस अधिकारी तर पोलिस कॉन्स्टेबलही घुळाच्या गोळ्या लागून गंभीर जखमी झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्याचे पोलिस दलच नाही तर समाजमनही हादरून गेले होते. पोलिस खात्यातील कर्मचार्‍यांची मुस्कटदबी, त्यांच्या प्रश्‍नाला वाचा फुटली होती. यानंतर पोलीसांना अनेक प्रकारच्या सवलतीही मिळाल्या होत्या. प्रशासकीय अन्यायाच्या प्रसंगी धुळाचा दाखला दिला जायचा. या प्रकरणी धुळा कोळेकरला जन्मठेप झाली संपूर्ण राज्यभरात धुळा कोळेकर खलनायक म्हणून ओळखला जाऊ लागला. 

मात्र त्याच धुळाचा मुलगा  रणजित पोलीस उपनिरीक्षक म्हणून  पोलीस दलात सेवा करण्यासाठी सज्ज झाला आहे. धुळा कोळेकर यास जन्मठेप झाल्यानंतर रणजितच्या आई आणि भावाने मोठ्या जिद्दीने त्याला शिकवले. प्राथमिक शिक्षण गावात तर जूनियर कॉलेजचे शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे पूर्ण केले.  

2016 साली पालघर येथे त्याची पोलीस दलात  निवड झाली तरीही अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगल्यामुळे त्या पदावर हजर न होता रणजितने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून प्रशासकीय अधिकारी बनण्याचा निर्धार व्यक्त केला. पी.एस.आय पदासाठी मुख्य परिक्षा जुन 2017 ला दिली आणि शारिरिक चाचणी नोव्हेबर 2017 झाली. 20 जुनला निकाल जाहीर झाला आणि रणजीत पोलीस उपनिरीक्षक झाला. भावाचे पाठबळ, आईची प्रेरणा घेणार्‍या रणजितला  वडीलानीही मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार महादेव कारंडे, बुध्ददेव भालशंकर यांनी मोठी मदत केल्याचे तो बोलून दाखवतो.