Thu, Apr 25, 2019 21:47होमपेज › Solapur › शहरात रमजान ईद उत्साहात

शहरात रमजान ईद उत्साहात

Published On: Jun 16 2018 10:49PM | Last Updated: Jun 16 2018 10:03PMसोलापूर ः प्रतिनिधी

प्रत्येक मुस्लिमानाने कुराणमध्ये सांगितल्याप्रमाणे वागायला हवे.  एकमेकांची आदर करुन आनंदाने राहायला हवे. ज्याचे विचार चांगले तोच खरा मुसलमान आहे. प्रत्येक मुसलमानाने कुराणला आपल्या हृदयात ठेवायला हवे, असे आवाहन शहर काझी अमजदअली काझी यांनी केले.रमजान ईदनिमित्त शनिवारी होटगी रस्त्यावरील आलमगीर ईदगाह मैदान येथे सामूहिक नमाज पठण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी मुस्लिमबांधवांना उपदेश केला. 

काझी म्हणाले की, रोजा ठेवताना गेल्या महिन्याभरात तुम्ही  मनामध्ये इतरांप्रती जी पवित्र भावना जोपासली तशीच ती कायम आयुष्यभर जोपासायला हवी. तुम्हाला जर खरे मुसलमान व्हायचे असेल तर आपल्यामुळे इतरांना दुःख होऊ नये, याची काळजी घ्या. आपल्याला आनंद वाटता आला पाहिजे आणि दुसर्‍याच्या प्रगतीने आपल्या मनात इर्शा निर्माण होऊ नये.आपण ज्या मुल्कमध्ये राहतो त्याचे ऋण फेडायचे असले तर तिथे सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करा. हिंदू-मुस्लिम धर्माचे नाते भावाप्रमाणे जपा.

अल्लाहकडून आपल्याला आशीर्वाद तेव्हाच मिळेल जेव्हा आपण स्वतः दुसर्‍यासाठी दुवा मागू.  इतरांना सुखी पाहून ज्याला सुख मिळते अल्लाह त्याला कधीच दुःखात ठेवत नाही. त्यामुळे अन्याय, अत्याचाराशी लढा, दिनदुबळ्यांची मदत करा, गरीब घरातील मुला-मुलींना शिक्षणासाठी मदत करा. नमाज अदा झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या. 

सामूहिक नमाज पठणामध्ये अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शनिवारी सकाळी साडेआठ वाजता होटगी येणारे मार्ग पोलिसांनी तात्पुरते बंद केले होते. तेथील वाहतूक गांधी चौकमार्गे विजापूर रस्ता, आयटीआय चौकी, भारती विद्यापीठ, डी-मार्टकडून आसरा मैदान येथे वळविली,  तर आसरा चौकाची वाहतुकही नई जिंदगीपासून कुमठा नाकामार्गे गुरुनानक चौक अशी केली होती. यावेळी पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहायक पोलिस आयुक्त महावीर सकळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरसिंग अंकुशकर आदी उपस्थित होते.

कुठे कुणी केला उपदेश

आलमगीर ईदगाह मैदान, होटगी रोड येथे मुफ्ती अमजदअली काझी यांनी, पानगल हायस्कूल येथे मौलान हसन निझामी यांनी, आसार ईदगाह मैदान येथे मौलाना हुसेन पठान यांनी, जुनी मिल ईदगाह मैदान येथे फजलुल्लाह खतीब यांनी, तर रंगभवन येथील अहले हदिस ईदगाह मैदान येथे मौलाना ताहेर बेग यांनी उपदेश केला.