Tue, Jul 16, 2019 11:54होमपेज › Solapur › 'राम जन्मभूमी-बाबरी सामोपचाराने सोडवा'

'राम जन्मभूमी-बाबरी सामोपचाराने सोडवा'

Published On: Dec 16 2017 1:50AM | Last Updated: Dec 15 2017 9:44PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

अयोध्या येथील राम जन्मभूमी बाबरी मस्जिदच्या भूमीबद्दलचा प्रश्न हिंदू व मुस्लिम समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन सामोपचाराने सोडवावा. या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचा आदर करून विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे या शैक्षणिक संस्थेच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात मध्यस्थी याचिका दाखल करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी दिली.

या मध्यस्थी याचिकेमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे एक भव्यदिव्य आणि सुंदर असे मंदिर प्रत्यक्ष मूळ राम जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या 2.77 एकर विवादास्पद भूमीवर सर्व विवाद मिटवून, सर्व पक्षीयांची मान्यता मिळवून बांधण्यात यावे. 

श्रीराम जन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या 2.77 एकर जमिनी लगत असलेल्या 67 एकर भारत सरकारद्वारा संपादित संपूर्णपणे मोकळी व पडीक जमीन शासनातर्फे मानवता, सहिष्णुता व विश्वशांतीचा संदेश देणार्‍या भारतीय संस्कृती, परंपरा व तत्त्वज्ञानाचे एक मूर्तिमंत स्वरूप म्हणून उदयास येऊ शकेल अशा विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनच्या उभारणीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी. 

ज्यायोगी त्यावर हिंदू, इस्लाम, ख्रिश्‍चन, बौध्द, शीख, जैन, पारसी, ज्यू अशा विविध धर्मींयांची भव्यदिव्य व सुंदर अशी मंदिर, मस्जिद, चर्च, विहार, गुरुद्वारा इत्यादी प्रार्थनास्थळे, त्या त्या धर्मांच्या संकल्पना व श्रद्धेनुसार उभारता येऊ शकतील. 

अयोध्यातील मूळ राम जन्मभूमीच्या जागेवर प्रभू श्रीराम चंद्रांचे भव्य व सुंदर मंदिर व त्या लगतच्या मोकळ्या व पडीक जागेत विश्व धर्मी श्रीराम मानवता भवन समन्वयाने व सामंजस्याने उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नामवंत व जाणकार शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ, सामाजिक भान असलेले विविध पक्षातील व धर्मातील नेते आणि इतर विविध क्षेत्रातील मान्यवरांची एक 27 सदस्यीय अखिल भारतीय सुकाणू समिती स्थापन करून हा प्रश्न सामोपचाराने सोडविण्यात यावा याबाबतचा उल्लेख याचिकेत करण्यात आला असल्याचे  प्रा. डॉ.  विश्वनाथ कराड यांनी सांगितले.