Tue, Jun 02, 2020 19:17होमपेज › Solapur › रेल्वेला पूर्ण झाली १६५ वर्षे!

रेल्वेला पूर्ण झाली १६५ वर्षे!

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 8:21PMसोलापूर : इरफान शेख

भारतीय रेल्वेला 16 एप्रिल रोजी 165 वर्षे पूर्ण होणार असल्याने वेगवेगळ्या रेल्वे झोनमध्ये पुरस्कार सप्ताह आयोजित केला असल्याची माहिती सोलापूर मध्य रेल्वे विभागातून देण्यात आली. ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या कार्यकाळात 16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या  स्थानकादरम्यान  धावली होती. भारतीय  रेल्वे वर्षस्थापनेला आपल्या   17  झोनमधील उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहे.

भारतीय रेल्वेसाठी मिनिस्ट्री ऑफ रेल्वे म्हणून स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले. जागतिक पातळीवर विचार केला असता भारतीय रेल्वेचे जाळे चौथ्या क्रमांकावर येते. मार्च 2017 पर्यंत 1.308 मिलियन कर्मचारी व अधिकारी भारतीय रेल्वेमध्ये कार्य करत आहेत. 1947 पासून आजपर्यंत एकूण 39 रेल्वेमंत्र्यांनी रेल्वेमंत्रीपदाचा कार्यभार हाताळला आहे. नवी दिल्ली येथील रायसिना रोडवरील रेल्वे भवनमधून भारतीय रेल्वेचे कामकाज चालते.

दरवर्षी एप्रिल महिन्यात भारतीय रेल्वेतर्फे स्थापना  दिवस किंवा सप्ताह साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षी नागपूर येथे पुरस्कार सप्ताह आयोजित केला आहे. नागपूर येथे होत असलेल्या कार्यक्रमात 12 एप्रिलला उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांना व अधिकार्‍यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर डी.के. शर्मा यांनी दिली. 12 एप्रिल रोजी नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. 8 चे उद्घाटन करण्यात येईल.

भारतीय रेल्वेमंत्री या विभागाचे प्रमुख आहेत. 7 सदस्यीय रेल्वे बोर्ड रेल्वेमंत्री यांना कार्य करण्यास मदत करते. या रेल्वे बोर्डाला वेगवेगळ्या 17 झोनमधील मॅनेजर रिपोर्ट करतात. 17 झोनमधील वेगवेगळ्या डिव्हिजनमधील डीआरएम रेल्वे झोन मॅनेजरला रिपोर्ट करतात. मार्च 2017 मधील आकडेवारीनुसार भारतीय रेल्वेमध्ये 2 लाख 77 हजार 987 मालवाहतुकीचे डबे आहेत. 70 हजार 937 प्रवासी कोच आहेत. 11 हजार 452 इलेक्ट्रिक   व  डिझेल इंजिन आहेत.

16 एप्रिल 1853 साली पहिली रेल्वे धावली

ब्रिटिश भारतात गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांच्या काळात 16 एप्रिल 1853 साली बोरीबंदर ते ठाणे (34 कि.मी.) स्थानकादरम्यान पहिली रेल्वे धावली होती. वाफेवरील इंजिनाने 400 प्रवाशांना घेऊन प्रवास केला होता. भारतीय रेल्वतर्फे  दरवर्षी वर्षस्थापना दिवस साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी 165 वा स्थापना दिवस व सप्ताह साजरा होणार आहे.

 

Tags : solapur, solapur news, Indian Railways, 165 years,