Fri, Jul 19, 2019 22:03होमपेज › Solapur › रेल्वे प्रवाशांच्या नशिबी विकतचे पाणी!

रेल्वे प्रवाशांच्या नशिबी विकतचे पाणी!

Published On: May 19 2018 1:36AM | Last Updated: May 18 2018 8:09PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर रेल्वेस्थानकावर  मोफत पाणीसेवा ही संकल्पना नाहीशी होत चालली  आहे. रेल्वे  प्रशासनाच्या  आयआरसीटीसी या संस्थेकडून 5 रुपयांत 1 लिटर शुध्द फिल्टर्ड पाणी विक्री केली जात आहे. आता सोलापूर  रेल्वेस्थानकामधून जाणार्‍या प्रवाशांना पिण्यासाठी  मोफत शुध्द पाणी मिळणे कठीण होत आहे. रेल्वे प्रशासनास फक्त पैसे असणार्‍या प्रवाशांची काळजी आहे. गरीब व गरजू प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या नजरेतून वगळले गेले आहेत.

गुरुवारी सकाळी सोलापूर रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मवर 4 व 5 आणि बुकिंग कार्यालयात वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात आले आहे. असे एकूण आठ वॉटर वेंडिंग मशीन सोलापूर रेल्वेस्थानकात बसविण्यात आले आहेत. भारतीय रेल्वेमध्ये खानपान सेवा पुरविणारी संस्था आयआरसीटीसी कडून या वॉटर वेंडिंग मशीन आल्या आहेत. 5 रुपयांचे कॉईन यामध्ये घातल्यास 1 लिटर शुध्द पाणी बाहेर येते.अनेक प्रवासी आपल्याकडील प्लास्टिकच्या बाटलीत वॉटर वेंडिंग मशीनमधून पाणी भरुन घेत आहेत.परंतु ज्या प्रवाशांकडे सुट्टे पाच रुपयांचे नाणे आहे अशा प्रवाशांनाच वॉटर वेंडिंग मशीनमधून 1 लिटर पाणी प्राप्त होते. गरीब व गरजू प्रवाशांना मात्र घसा  कोरडाच ठेवावा लागेल.

शुध्द पाणी पिणे  हा प्रत्येक नागरिकाचा  व प्रवाशाचा हक्क आहे.ज्या प्रवाशांकडे पाच रुपयांचे नाणे नाही किंवा आर्थिक बाजूने कमकुवत असेल, जर त्याकडे पाच रुपये नसतील अशावेळी या प्रवाशांनी किंवा नागरिकांनी शुध्द व फिल्टर्ड पाणी पिऊ नये का,असा प्रश्‍न निर्माण होत आहे. रेल्वे प्रशासनाने ज्याप्रमाणे वॉटर वेंडिंग मशीनद्वारे शुध्द पाणी 5 रुपये प्रति लिटर देण्याचा प्रयत्न केला आहे त्याप्रमाणे शुध्द व मोफत पाणीसेवादेखील असणे गरजेचे आहे. अशी अनेकवेळा प्रवाशांनी व प्रवासी संघटनांनी रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे.

5 रुपयांचे सुट्टे नाणे असेेल तरच पाणी !

सोलापूर रेल्वेस्थानकामध्ये गुरुवारी सकाळी दोेन वॉटर वेंडिंग मशीन बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकूण आठ वॉटर वेंडिंग मशीन झाल्या आहेत. या मशिनमध्ये पाच रुपयांचे सुट्टे नाणे टाकल्यावरच 1 लिटर शुध्द पाणी बाहेर येते. ऐन प्रवासावेळी सुट्टे नसेल तर पाणी मिळणे कठीण आहे.