Mon, Mar 25, 2019 09:54होमपेज › Solapur › रेल्वे माथाडी कामगारांच्या जीवाशी खेळ

रेल्वे माथाडी कामगारांच्या जीवाशी खेळ

Published On: Jun 06 2018 10:27PM | Last Updated: Jun 06 2018 9:08PMसोलापूर : इरफान शेख

रामवाडीशेजारी व रेल्वेस्थानकाला चिटकूनच रेल्वे मालधक्‍का (गुडशेड) आहे. गेल्या सहा वर्षांपासून या  रेल्वे  मालधक्क्यावर 1000 ते 1500 माथाडी कामगार कार्यरत आहेत. हजारो सिमेंट पोती  रेल्वे वॅगनमधून खाली उतरवताना त्यांच्या आरोग्याच्या होणार्‍या हेळसांडीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने अनेक माथाडी कामगारांचे आरोग्य रोगीष्ट होऊन आयुष्यमानही कमी होत चालले आहे. या माथाडी कामगारांना कोणी वालीच नसल्याने रेल्वे प्रशासन व ठेकेदार त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

या कामगारांच्या समस्यांकडे व आरोग्यसुविधेकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. हे कामगार कोणत्याही सुरक्षेच्या साहित्याविना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. हँडग्लोज, मास्क हे साहित्य ठेकेदार देत नाही किंवा रेल्वे प्रशासनही देत नाही. फक्त पिळवणूक होत आहे.

रामवाडी भागाला चिटकूनच रेल्वे प्रशासनाचे मोठे गुडशेड (रेल्वे मालधक्‍का) आहे. गेल्या सात ते आठ वर्षांपासून हे गोडावून कार्यरत आहे. त्यामध्ये 1000 ते 1500 हमाल (माथाडी) कामगार रेल्वे मालगाडीमधून प्रत्येकी तीन तासाला 54  हजार  पोती खाली उतरवून ठेवण्याचे कार्य करत आहेत. महिन्याला सुमारे कोट्यवधी  पोती मालगाड्यांमधून रिकामे  करुन ट्रकमध्ये भरण्याचे कार्य माथाडी कामगार करतात. या कामगारांची मान्यताप्राप्त संघटनादेखील आहे. गेल्या सहा ते आठ वर्षांपासून या माथाडी कामगारांकडे  खासगी सामाजिक संस्था किंवा शासनाने कोणीच लक्ष न दिल्याने त्यांचे आयुष्यमान कमी होत आहे. अनेक  कामगार आरोग्याच्या विविध समस्यांनी व रोगांनी ग्रासले गेले आहेत. त्यामध्ये फुफ्फुसाचा आजार अनेक कामगारांना गिळंकृत करत आहे.

रेल्वे मालधक्क्यात रोज हजारो व लाखो सिमेंटची पोती या मालधक्क्यात रेल्वे मालगाडीद्वारे दाखल होतात. अन्नधान्यांची पोती, खत व बी-बियाणांची पोतीसुध्दा दाखल होतात. अनेक ठेकेदार माल वाहतुकीचा ठेका घेतात व  या हमालांमार्फत शहर व जिल्ह्यात माल पोहोच करतात. ज्यावेळी हा माल रेल्वेद्वारे मालधक्क्यात दाखल होतो त्यावेळी माथाडी कामगार महत्त्वाची भूमिका बजावतात.
प्रत्येक गोडावूनमध्ये ठिक-ठिकाणी सिमेंटचे मोठमोठे थर साचल्याने या कामगारांना जेवणासाठी बसण्याची व्यवस्था नाही. सिमेंटच्या धुराळ्यात जेवण करावे लागते.पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था नसल्याने सुमारे 1 कि.मी.पर्यंत पायपीट करत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. 1000 ते 1500 कामगारांमध्ये 1500 स्क्वेअर फुटांचे हमालशेड उभे करण्यात आले आहे.दाटीवाटीने बसून 200 ते 300 हमाल जेवण करतात.  माथाडी कामगारांनी अनेकवेळा रेल्वे प्रशासनाकडे न्याय मागितला असता ठेकेदारांकडे मागणी करा, असे सांगितले जाते. ठेकेदार फक्‍त हमाल या नजरेने पाहतो व पिळून काम करुन घेतो. माणूस या नजरेने पाहण्याची कोणाचीही इच्छा नसल्याची खंत एका माथाडी कामगाराने सांगितली.

या मालधक्क्यात अन्नधान्यांची   लाखो पोती येतात. यामध्ये गहू, तांदूळ, व ज्वारी ही पोती जास्त असतात.या मालधक्क्यात गहू,ज्वारी व तांदळांच्या पोत्यांसाठी वेगळे असे गोडावून नाही, तर ही अन्नधान्यांची पोती सिमेंटच्या गोडावूनमध्ये ठेवली जातात. ज्यामुळे सिमेंटमधील रासायनिक द्रव्ये अन्नधान्यांमध्ये मिश्रित होण्याची शक्यता आहे.  त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कमीतकमी अन्नधान्याची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी या माथाडी कामगरांनी अनेकवेळा केली  आहे.

रेल्वे मालधक्क्यातील माथाडी कामगारांच्या समस्या
सिमेंटच्या धुराळ्यात जेवण करावे लागत आहे. खासगी कँटिनवाल्यांकडून लूट होत आहे. अनेक माथाडी कामगार फुफ्फुसाच्या रोगाने ग्रस्त. त्वचा रोगाची समस्या. शौचालय नसल्याने रेल्वे रुळांवर शौच केले जात आहे.पिण्यासाठी पाणी नाही. माथाडी कामगर गेल्या आठ वर्षांपासून सुरक्षेच्या साहित्याविना काम करत आहेत. हँडग्लोज, मास्क आदी साहित्य नाही.