Wed, Apr 24, 2019 22:09होमपेज › Solapur › राममंदिराचा निकाल आपल्या बाजूने लागेल

राममंदिराचा निकाल आपल्या बाजूने लागेल

Published On: Jan 19 2018 2:01AM | Last Updated: Jan 18 2018 10:46PMपंढरपूर : प्रतिनिधी

राम मंदिरासंदर्भातील भक्‍कम पुरावे आपण सर्वोच्च न्यायालयास सादर केले आहेत. जून 2018 मध्ये राममंदिराचा निकाल लागणार आहे. हा निकाल आपल्या बाजूने लागणार असून राममंदिर उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे, असा विश्‍वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्‍त केला.

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमधील वातानुकुलित सभागृहात आयोजित संत संगम सभेत  ते बोलत होते. यावेळी राज्याच्या विविध भागातून आलेले सुमारे 400 पेक्षा जास्त महाराज मंडळींची उपस्थिती होती. 

सायंकाळी साडे सहा वाजता सभेचा समारोप झाला. यावेळी वारकरी संप्रदायातील सर्वच प्रमुख फडकरी, दिंडीकरी महाराज मंडळी उपस्थित होते. भागवत म्हणाले की, हिंदू धर्म हा सर्वात पुरातन आहे. देशावर 700 वर्षे मुस्लिमांनी, 150 वर्षे ख्रिश्‍चनांनी राज्य केले तरीही हिंदू धर्म संपला नाही. जाती-पातींच्या विळख्यात अडकलेल्या हिंदू धर्मास बाहेर काढण्यासाठी  जाती-पातीच्या भिंती पाडून टाकाव्यात. यातून धर्मास बाहेर काढण्याकरिता सर्वांनी पुढाकार घ्यावा. ग्रामीण भागात जावे, कीर्तन, प्रवचनातून लोकांचे प्रबोधन करावे. हिंदू धर्माचा प्रसार करावा. राजकारणी लोक राजकारणासाठी जातीचा वापर करीत आहेत, अशा लोकांना उघडे पाडण्याचे काम महाराज मंडळींनी प्रबोधनातून करावे, असेही आवाहन भागवत यांनी केले. यावेळी ह.भ.प. चैतन्य महाराज देगलूकर, काडसिद्धेश्‍वर महाराज यांनीही आपले विचार मांडले.  तीन सत्रात चाललेल्या या संत सभेत सकाळच्या सत्रात गो सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली. तत्पूर्वी, सकाळी साडेसहा वाजता लक्झरी बसेसमधून आणलेल्या 450 महाराजांनी एकत्रितपणे जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी मोहन भागवत यांनी तुळसी अर्चन पूजा केली.