Sat, Apr 20, 2019 16:18होमपेज › Solapur › आरपीआयला व्यापक स्वरुप देण्यासाठी सज्ज रहा

आरपीआयला व्यापक स्वरुप देण्यासाठी सज्ज रहा

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 10:56PM सोलापूर : प्रतिनिधी

भविष्यात पक्षाला व्यापक स्वरुप देण्याच्या दृष्टीने देशातील प्रत्येक राज्यात पक्षसंघटन वाढविणार असल्याने कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. रविवारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे आरपीआय आठवले गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी आठवले बोलत होते. 

मंत्री आठवले म्हणाले की,  भीमा कोरेगाव येथे झालेल्या जातीय दंगलीत दलित समाजातील लोकांवर अन्याय करण्यात आला असून यावेळी कोंबिंग ऑपरेशन करण्यात आले होते. घटना आपल्याला समजताच आपण मुख्यमंत्र्यांना भेटून कोंबिंग ऑपरेशन थांबविण्याची विनंती केली होती. तसेच हजारो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे माघारी घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यानुसार दलित समाजातील तरुणांवर दाखल करण्यात आलेले हे गुन्हा माघारी घेण्याचे आश्‍वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. येणार्‍या काळात दलित बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेेतले जातील. तसेच भीमा कोरेगाव याप्रकरणाचा काही लोकांनी राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्ही थोडीशी शांततेची भूमिका घेतली. त्यामुळे काही लोकांना दलितांचे सर्वात मोठे नेते झाल्याचा भास झाला असल्याचा टोला यावेळी आठवले यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.

पक्षाची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे महाराष्ट्र, मुंबई, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश तसेच आता देशातील जवळपास सर्वच राज्यात पक्षाची ताकद वाढविणार असल्याचे आठवले यांनी जाहीर केले. तसेच पक्षाला व्यापक स्वरुप देण्याच्या दृष्टीने बौध्द समाजाबरोबर धनगर, मुस्लिम, माळी, कोळी असा इतर समाजही पक्षात घेण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याचे आठवले यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी करताना पक्ष संघटना आणि शिस्त याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी अशोक सरवदे, राजरत्न इंगळे, के.डी. कांबळे, ज्ञानदेव खंडागळे, दीपक चंदनशिवे, सुनील सर्वगोड, संतोष पवार, आबा दैठणकर, सोमनाथ भोसले, अतुल नागटिळक, बाळासाहेब गायकवाड, अ‍ॅड. सिध्दार्थ बनसोडे आदी उपस्थित होते.