Sun, Jul 21, 2019 06:19होमपेज › Solapur › चंद्रभागेतील पुंडलिक मंदिर पाण्यात

चंद्रभागेतील पुंडलिक मंदिर पाण्यात

Published On: Aug 30 2018 1:32AM | Last Updated: Aug 29 2018 11:48PMपंढरपूर : प्रतिनिधी

उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर भीमा नदीपात्रात सोडण्यात आलेला 10 हजार क्युसेक पाण्याच्या विसर्गाने नदी दुथडी भरून वाहत असून, यात पुंडलिक मंदिर पाण्यात गेले आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मंगळवारी महाद्वार घाट पायरीवर आलेले पाणी बुधवारी कमी झाले आहे. दरम्यान, आज सकाळी पुंडलिक मंदिराजवळ स्नानासाठी गेलेला तरुण पाण्यात वाहून गेल्याने या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उजनी धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणातून  प्रथम 5 हजार क्युसेकचा व त्यानंतर 10 हजार क्युसेकचा विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला होता. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पुन्हा भीमा नदीच्या विसर्गात वाढ करून विसर्ग 15 हजार क्युसेक करण्यात आल्याने भीमा नदीला पूरपरिस्थती निर्माण झाली आहे. मंगळवारी पहाटे हा विसर्ग पंढरपूर येथे दाखल झाल्याने पुंडलिक मंदिर पाण्यात गेले आहे. तर, महाद्वार घाटाच्या पायरीला पाणी आले होते. पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मात्र मंगळवारी सायंकाळी विसर्ग कमी करण्यात आल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे.दरम्यान बुधवारी सकाळी येथे स्नान करण्यासाठी आलेल्या आणखी तरुण राहुल काथार (जळगाव) पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने पुंडलिक मंदीर येथे स्नान करण्यासाठी जाणार्‍या भाविकांना पोलीसांकडून बंदी घालण्यात आली आहे. महिला भाविकांना खोल पाण्यात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. येथील लोखंडी कठडयांचा अंदाज येत नाही.त्यामूळे येथे भाविकांच्या जीवास धोका असल्याने येथे शहर पोलीस स्टेशनच्यावतीने दोन पोलीस कर्मचार्‍यांना तैनात करण्यात आले आहे.