Sun, Aug 25, 2019 08:43होमपेज › Solapur › लोकाभिमुख कारभारासाठी सुसंवाद हवाच...

लोकाभिमुख कारभारासाठी सुसंवाद हवाच...

Published On: Aug 23 2018 10:46PM | Last Updated: Aug 23 2018 10:12PMसर्वसामान्य लोकांना केंद्रीभूत मानून काम करणार्‍या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. तसेच नवनव्या संकल्पना अंमलात आणून प्रशासनातील काही किचकट कामे सुलभतेने केली जातात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा मोठा फायदा होतो. अनेकवेळा जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालये ही सर्वसामान्य लोकांच्या विकासाची केंद्रे ठरली आहेत. शासन आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून या यंत्रणा काम करीत असतात. 

त्यामुळे शासनाने सर्वसामान्यांच्या विकासासाठी घेतलेले निर्णय त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी या यंत्रणाची असते. मात्र अनेकवेळा शासकीय काम आणि सहा महिने थांब, अशी प्रचिती शासकीय यंत्रणाच्या कामकाजामधून येते. शासनाने घेतलेले निर्णय सर्वसामान्यां पर्यंत पोहचण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे वेळेत माहिती न मिळाल्याने अनेकांचे मोठे आर्थिक नुकसानही होते. त्यामुळे शासनाने यासाठी जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याचा सपाटाच लावला आहे.अनेक योजनांच्या जाहिराती दूरदर्शन, वर्तमानपत्रे आणि सामाजिक प्रसार माध्यमातून केल्या जातात. मात्र त्या जाहिराती वाचून किंवा ऐकून अनेक लोक संबंधित यंत्रणेकडे त्याची चौकशी करायला येतात. त्यावेळी त्यांना समाधानकारक माहिती मिळत नाही. तर संबंधित लोकांना टाळण्यासाठी शासकीय यंत्रणेतीलच काही मंडळी त्यांना उडावउडवीची उत्तरे देवून माघारी पाठवतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना शासनाच्या या योजना फसव्या असल्याचा भास होतो. त्यामुळे काही मंडळींनी या योजनेची माहिती आणि लाभ घेण्यासाठी बराच अटापीटा केलेला असतो. त्यांचा मात्र भ्रमनिरास होतो.तर अनेकवेळा अशा योजनांची सविस्तर माहिती घेवून त्या लोकांना मिळवून देण्यासाठीची एजंटगिरी सुरु होते. शासकीय कार्यालयातीलच काही मंडळी हा उद्योग सुरु करतात आणि एजंटामार्फत आलेल्या लेाकांनाच या योजना कशा राबवून घ्यायच्या, त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक असतात, याची माहिती देतात. त्यामुळे शासनाच्या या योजना मिळविण्यासाठी ही पुन्हा एजंटगिरी सुरु होते आणि त्यामुळे सर्व यंत्रणाच बदनाम होवून जाते. त्यासाठी हा प्रकार टाळण्यासाठी आणि लोकांपर्यंत थेट चांगले निर्णय आणि माहिती पोहचविण्यासाठी त्या यंत्रणांचे प्रमुख म्हणून असणार्‍यांनी थोडासा प्रसार माध्यमांशी सुसंवाद ठेवला तर सोईस्करपणे ती माहिती लोकांपर्यंत पोहचू शकते आणि त्यांचा उद्देशही सफल होवू शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील अथवा कोणत्याही खात्याचे प्रमुख अधिकारी असतील यांनी लोकप्रतिनिधी, प्रसार माध्यमे आणि सर्वसामान्य लोकांशी सुसंवाद ठेवायलाच हवा आणि तसे झाले तरच त्यांच्या यंत्रणेचा कारभार हा लोकाभिमुख होणार आहे अन्यथा ती यंत्रणा बदनामच ठरणार आहे.