Fri, May 24, 2019 09:02होमपेज › Solapur › जनआरोग्यमधून पावणेदोनशे कोटी लाभ

जनआरोग्यमधून पावणेदोनशे कोटी लाभ

Published On: Jan 17 2018 2:04AM | Last Updated: Jan 16 2018 10:28PM

बुकमार्क करा
सोलापूर : रणजित वाघमारे

गरीब, गरजू व सर्वसामान्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना वरदान ठरली आहे. यातून जिल्ह्यातील गरजू रुग्णांना जवळपास पावणेदोनशे कोटी रुपयांचा लाभ  31 डिसेंबर 2017 पर्यंत मिळाला आहे.

राज्यामध्ये 2 जुलै 2012 पासून सोलापूरसह रायगड, धुळे, नांदेड, अमरावती, गडचिरोली, मुंबई शहर व उपनगरे या जिल्ह्यांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. त्याचे पुढे गेल्यावर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना असे नामकरण करण्यात आले आहे. ज्यामध्ये 927 वरून अकराशेपर्यंत आजारांचा समावेश करण्यात आला आहे. याचा लाभ 1 लाख किंवा कमी उत्पन्न असणारी व्यक्‍ती घेऊ शकते. सध्या यात वाढ होऊन दीड लाखापर्यंत उत्पन्न असणारी कुटुंबे तसेच पिवळे, केशरी शिधापत्रक, अन्नपूर्णा आणि अंत्योदय कार्डधारक कुटुंबे लाभ घेऊ शकतात.

सोलापूर जिल्ह्यात गरजू रुग्णांसाठी 2 हजार 599 आरोग्य शिबिरे घेतली आहेत. ज्यातून 82 हजार 968 लाभार्थ्यांची तपासणी व उपचार करण्यात आले आहेत. त्यातील 6 हजार 845 गंभीर आजांराचे रूग्ण पुढील उपचारासाठी यातील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

या योजनेतील आजार व लाभार्थ्यांची संख्या पुढीलप्रमाणे : एन्जोप्लास्टी व हृदयरोग शस्त्रक्रिया - 3 हजार 679, अतिदक्षता विभाग - 1 हजार 332, सर्वसाधारण शस्त्रक्रिया- 1 हजार 264, लहान मुलांवर उपचार व शस्त्रक्रिया - 5 हजार 537, हृदयरोग - 8 हजार 599, डायलेसिस व किडणी रोग उपचार - 9 हजार 962, कर्करोग शस्त्रक्रिया व उपचार - 19 हजार 460, पॉलिट्रामा - 8 हजार 124, स्त्रीरोग शस्त्रक्रिया - 566, मेंदू व मज्जारज्जू आजार - 1 हजार 852, नाक, कान व घसा - 7 हजार 785, बर्न - 300, अस्थिरोग शस्त्रक्रिया - 1 हजार 720, जनन  व मूत्र संस्थेच्या शस्त्रक्रिया - 8 हजार 65. या सर्वांसाठी 174 कोटी 61 लाख 72 हजार 668 रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.