Mon, Apr 22, 2019 11:42होमपेज › Solapur › सोलापूर : टेंभुर्णी वीज कार्यालयाचा शेतकऱ्यांनी घेतला ताबा

सोलापूर : टेंभुर्णी वीज कार्यालयाचा शेतकऱ्यांनी घेतला ताबा

Published On: Dec 09 2017 2:46PM | Last Updated: Dec 09 2017 2:51PM

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी 

वीज वितरण कंपनीने वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे प्रहार संघटनेचे प.महा.संघटक अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु केले. टेंभुर्णीतील  विजवितरण  कार्यालय ताब्यात घेऊन कार्यालयातच ठिय्या मांडला आहे. वीज पूर्ववत सुरु झाल्याशिवाय माघार घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

विजपंपाची थकबाकी वसुलीसाठी वीज वितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. यामुळे अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी दुपारी १२ वा. सुमारास वीज कनेक्शन तोडल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी टेंभुर्णीतील कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. अचानक केलेल्या आंदोलनामुळे वीज वितरण कर्मचाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला आहे.

यावेळी अतुल खुपसे यांनी सांगितले की, ७.५ एच.पी.वरील विजपंपास वीज मीटर असला पाहिजे. त्याप्रमाणे वीजबिल आकारणी होत नाही. वीज कनेक्शन तोडण्यापूर्वी संबंधितांना माहिती दिली पाहिजे. नियमानुसार १५ दिवस अगोदर नोटीस दिली पाहिजे. बिजबिल घरपोच मिळाले पाहिजे. काही शेतकऱ्यांना कनेक्शन नसताना लाखोंचे बिल आले आहे.

पूर्व कल्पना न देता वीज कनेक्शन तोडणे म्हणजे शेतकऱ्यांची भाकरी हिसकावल्या प्रमाणे आहे. अद्याप शेतकऱ्यांना उसाचे बिल मिळाले नाही तर मग पैसे कसे भरायचे असा प्रश्न उपस्थित केला आहे.

वीज सुरु होत नाही तोपर्यंत कार्यालयातून हालणार नाही असा इशारा दिल्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाले आहे. या आंदोलनात टेंभुर्णी, उपळवाटे, दहिवली, बेंबळे, कन्हेरगाव आदी गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले आहेत.