Thu, Nov 22, 2018 02:11होमपेज › Solapur › सहकारमंत्र्यांच्या बंगल्याचे अवैध बांधकाम प्रकरण सुनावणी लांबणीवर!

सहकारमंत्र्यांच्या बंगल्याचे अवैध बांधकाम प्रकरण सुनावणी लांबणीवर!

Published On: Jun 14 2018 1:36AM | Last Updated: Jun 13 2018 10:25PMसोलापूर : प्रतिनिधी

ना. सुभाष देशमुख यांनी महानगरपालिकेच्या आरक्षित जागेवर आलिशान बंगला बांधल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर मंगळवारी व बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे न्यायालयाने 25 जुलैची तारीख देऊन सुनावणी पुढे ढकलली आहे. 

मंगळवारीच या याचिकेवर सुनावणी होणे अपेक्षित होते तसेच यापूर्वीच्या सुनावणीत न्यायपीठाने 13 जूनची तारीख दिली होती. तथापि, न्यायपीठापुढे मोठ्या प्रमाणात दाखल असलेल्या पूर्वीच्याच याचिकांवर सुनावण्या चालल्याने ही केस बोर्डावर येऊ शकली नाही. त्यामुळे या याचिकेवरील सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या न्यायपीठापुढे ही सुनावणी होत आहे. 

अग्‍निशमन केंद्र आणि व्यापारी गाळ्यांसाठी राखीव असलेल्या होटगी रस्त्यावरील जागेवर मंत्री सुभाष देशमुख यांनी बंगला बांधल्याचा अहवाल महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयात सादर केल्यानंतर ना. देशमुख हे चांगलेच अडचणीत आले आहेत. या बंगल्याचे बांधकाम अवैध असून त्याचा परवाना मागे घेतल्याचा अहवाल मनपा आयुक्‍त अविनाश ढाकणे यांनी न्यायालयात सादर केला होता.

या अहवालानंतर न्यायपीठाने या याचिकेवरील सुनावणी 13 जून रोजी ठेवली होती. तथापि, कालच ही केस बोर्डावर घेण्याचा प्रयत्न झाला होता. या याचिकेवरील सुनावणीसाठी उच्च न्यायालयात 48 वा क्रमांक पडला होता. तथापि, दिवसभरात न्यायपीठापुढे 42 याचिकांवरच सुनावणी होऊ शकली. त्यामुळे ही याचिका बोर्डावर आलीच नाही. त्यामुळे न्यायपीठाने या याचिकेवरील सुनावणीसाठी आता 25 जुलैची तारीख निश्‍चित केली असल्याचे महापालिकेचे वकील अ‍ॅड. आय. एम. खैरदी यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.