Sun, Apr 21, 2019 06:29होमपेज › Solapur › पंढरपूर तालुक्यात ‘वडाप’ जोमात

पंढरपूर तालुक्यात ‘वडाप’ जोमात

Published On: May 18 2018 12:34AM | Last Updated: May 17 2018 11:43PMपंढरपूर : प्रतिनिधी

वाहनचालकांना शिस्त लावण्याकरिता जागो-जागी उभे राहून  दररोज लाखो रुपये दंड वसुली करणार्‍या पोलिस आणि परिवहन विभागाचे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील ‘वडाप’ प्रवासी वाहतूूक वाहनांकडेे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे अगदी कालबाह्य झालेली खटारा वाहने रस्त्यावर  चालवून  प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असतानाही त्या वाहनांची तपासणी किंवा त्यांच्यावर कसलीही कारवाई केली जात नाही. 

बुधवार दि. 16 मे रोजी वाडी कुरोली (ता.पंढरपूर) येथे बेकायदा प्रवाशी वाहतूक करणार्‍या जीपचा पुढचा टायर फुटला आणि ती जीप  विरूद्ध दिशेने येणार्‍या एका मालवाहतूक करणार्‍या टमटमला जाऊन धडकली. आणि त्या मागून येणारी मोटार सायकल त्या टमटमला धडकली. या तिहेरी अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला तर अन्य आठजण जखमी झालेले आहेत. या अपघाताचे कारण केवळ ती बेकायदा प्रवाशी वाहतूक करणारी जीप असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. या जीपचा पुढचा टायर फुटल्यामुळे जीप चुकीच्या बाजुला जाऊन या अपघातास कारण ठरली आहे. या जीपमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते आणि अशा प्रकारे प्रवासी वाहतूक रोज केली जात होती असे समजते. जीपचे टायर्स प्रवासी वाहतुकीसाठी योग्य नव्हते असे दिसून येते. टायर्स झीजून अगदी त्याचे आतल्या बाजूला असलेले दोरे बाहेर आलेले होते अशा प्रकारे टायर्सची झीज झालेली होती. तरीसुद्धा ही जीप रस्त्यावर धावत होती. पंढरपूर शहरातून चारही बाजूंनी जाणार्‍या सर्वच रस्त्यावर अशा प्रकारे वडापची प्रवाशी वाहतूक सुरू असून या वाहतुकीला कसलाही पायबंद घालण्याचे काम केले जात नाही. टमटम, जीप, मॅक्झिमो, ट्रॅव्हलर्स, खासगी बसेसच्या माध्यमातून पंढरपूर शहर आणि तालुक्यात बेकायदा प्रवाशी वाहतूक बोकाळली आहे.

परवानगी आणि वाहनाच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरून बेफाम वेगाने ही वाहने रस्त्यावर धावत असतात. एरव्ही रस्त्यावर उभा राहून परजिल्ह्यातील आणि परप्रांतीय मालवाहतूक वाहने, दुचाकीस्वारांना अडवून कागदपत्रांच्या नावाखाली त्यांच्याकडून दंड वसुली करणारे पोलिस, वाहतूक शाखा आणि परिवहन विभाग या बेकायदा प्रवाशी वाहतूकीकडे मात्र अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. वाहनाची प्रवाशी क्षमता, त्याची वापराची मुदत, चालकाचा परवाना आदी गोष्टींची कधीही विचारपूस या संबंधित विभागाकडून केल्याचे दिसून येत नाही.  त्यामुळे ही वाहतूक दरदिवशी वाढत असून प्रवाशांचा जीव धोक्यात घालून या वाहतुकीला पोलिस, परिवहन आणि वाहतूक शाखेचा आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे. 

पंढरपूर तालुक्यातील बहुतांश गावांत जाणार्‍या एस.टी. बसेस अनियमित असतात तसेच प्रवाशांच्या विनंतीनुसार त्या थांबत नाहीत.  त्यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावर एस.टी. रिकामी तर वडाप वाहतूक भरभरून चालत आहे. या वडापमुळे भविष्यात आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी वडापची तपासणी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे.