Sun, Jul 21, 2019 00:09होमपेज › Solapur › सोलापूर : बालविवाह रोखला, ग्रामस्थांकडून कथित प्रेमवीराची धुलाई

सोलापूर : बालविवाह रोखला, प्रेमवीराची धुलाई

Published On: Mar 24 2018 10:50PM | Last Updated: Mar 24 2018 10:51PMटेंभुर्णी :- ( सोलापूर)

माढा तालुक्यातील कन्हेरगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा साखरपुड्याच्या कार्यक्रमात बालविवाह उरकून टाकण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर येथील बालकल्याण समितीच्या कार्यककर्त्यांच्या दक्षतेने व टेंभुर्णी पोलिसांच्या मदतीने बालविवाह रोखण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी कथित प्रेमवीराला केलेल्या येथेच्छ धुलाईच्या घटनेमुळे टेंभुर्णी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कन्हेरगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह साखरपुड्याच्या कार्यक्रमात उरकण्याचा प्रयत्न सुरू होता. याबाबत अज्ञात व्यक्तीने बाल कल्याण समितीला कळविले होते. त्यानुसार बाल कल्याण समितीचे पदाधिकारी प्रकल्प समन्वयक शशिकांत चव्हाण व त्यांचे सहकारी नरसिंह उपाध्ये हे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आले व त्यांनी टेंभुर्णी पोलिसांना घटनेची माहिती देऊन पोलीस मदत मागितली. त्यानंतर पोलिस निरीक्षक आनंद खोबरे यांनी पोलिस हेडकॉन्स्टेबल गुटाळ पोलिस नाईक भोये यांना मदतीसाठी पाठवले.

कन्हेरगाव येथील मोरे वस्ती येथे बाल कल्याण समितीचे पदाधिकारी व पोलीस पोहचले त्यावेळी तेथे लगीनघाई सुरू होती.कचरेनाथ भीमराव ताटे (वय-२४) रा.कन्हेरगाव व तुळशी येथील अनवते वस्ती येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या  विवाहाची धामधूम सुरू होती. यामुळे बाल कल्याण समितीचे शशिकांत चव्हाण, नरसिंह उपाध्ये व पोलिस कर्मचाऱ्यांनी या विवाहातील संबंधिताना अल्पवयीन मुलीचा विवाह का करू नये याबाबत मार्गदर्शन केले. बाल कल्याण समितीच्या प्रबोधनाने मुलाच्या व मुलीच्या पालकांनी अखेर अल्पवयीन मुलाचा विवाह करणार नाही,  असे आश्वासन दिले.

 
कथित प्रेमवीरांची धुलाई

दरम्यान बाल कल्याण समितीचे पदाधिकारी प्रबोधन करीत असताना तेथे ऋषिकेश अरुण गायकवाड (वय-१९)रा.तांदुळवाडी, ता.बारामती व त्याचा साथीदार कृष्णा राजू धोत्रे (वय-२०) रा.घाडगे, बारामती हे अचानक दुचाकीवरून याठिकाणी आले. हातात धारदार कोयता घेऊन आलेल्या त्यातील एकाने ही माझी प्रेमिका असून अल्पवयीन मुलीचा विवाह करता येणार नाही असे म्हणत उपस्थितांना धमकावण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने उपस्थित सर्वजण आवाक झाले. एवढ्यात पोलिसांनी आम्ही पोलीस आहोत असे सांगताच ते दोघे घाबरले व पळू लागले. मात्र, अगोदर बालकल्याण समितीचे पदाधिकारी, पोलिस व नंतर या तरुणांनी कार्यक्रमात आणलेल्या व्यत्ययाने संतापलेल्या ग्रामस्थांनी दोघांचा पाठलाग सुरू केला. ते पळत शेजारील ऊसाच्या शिरले. ग्रामस्थांनी त्यांना शोधून त्यांची येथेच्छ धुलाई केली. त्यानंतर  सहाय्यक पोलिस निरीक्षक  राजेंद्र मगदूम हे पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळी पोहचले व जमावाच्या तावडीतून तरुणांची सुटका करत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात  दाखल करण्यात आले.
 

Tags : Preventing Child Marriage, Villagers Beaten Girls Lover, Solapur, Crime