Fri, Apr 19, 2019 12:21होमपेज › Solapur › दुष्काळी परिस्थितीचे टंचाई आराखडे तयार करा

दुष्काळी परिस्थितीचे टंचाई आराखडे तयार करा

Published On: Sep 10 2018 11:18PM | Last Updated: Sep 10 2018 10:51PMसोलापूर : प्रतिनिधी

 सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन सर्व विभागांनी आवश्यक नियोजन करावे. पंतप्रधान विमा योजनेतून जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लाभ मिळावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्याबाबत जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी येथे दिल्या.

जिल्ह्यातील टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोमवारी पालकमंत्री देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे,  प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती आणि पीक परिस्थितीबाबत सविस्तर सादरीकरण केले. टंचाई जाहीर करण्यासाठी आवश्यक असणार्‍या निकषांबाबतची  माहिती दिली.

पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता जास्तीत जास्त शेतकर्‍यांना पंतप्रधान विमा योजनेतून लाभ मिळावा यासाठी काळजी घ्यावी. पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करावे. पीक कापणी करताना महसूल, जिल्हा परिषद, विमा कंपनी यांनी संयुक्तपणे कापणी प्रयोग करावे. प्रत्येक गावात सहा पीक कापणी प्रयोग करावे. त्याबाबतची माहिती संबंधित मोबाईल अ‍ॅपवर भरावी. पंढरपूर, माळशिरस, सांगोला तालुक्यांतील हुमणी किडीचा प्रादूर्भाव झालेल्या परिसरात शेतकर्‍यांना माहिती द्यावी. त्यासाठी आकाशवाणीवरुन माहिती द्यावी, शेतकर्‍यांचे मेळावे घ्यावेत, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या.  टंचाईच्या शक्यता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने नियोजन आराखडा तयार करावा. जनावरांसाठी चारा साठा करून ठेवावा, अशा सूचना पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या.

लाभक्षेत्र विकास विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे, कार्यकारी अभियंता एस. एम. जगताप, रमेश वाडकर, बाबुराव बिराजदार, उपविभागीय अधिकारी मारुती बोरकर, प्रमोद गायकवाड, शिवाजी जगताप,  ज्योती पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी रामचंद्र उगिले, सहाय्यक निबंधक वैशाली साळवे, रविंद्र माने, आर. एन. कांबळे आदी उपस्थित होते.