Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Solapur › गर्भवती माकडिणीची बाळंतपणासाठी आबाळ!

गर्भवती माकडिणीची बाळंतपणासाठी आबाळ!

Published On: May 21 2018 11:14PM | Last Updated: May 21 2018 10:30PMसोलापूर :  इरफान शेख

शनिवारी  गरोदर माकडीण प्राणीप्रेमींना  आढळली आहे. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयात पाठवून तिची तपासणी करून ती गरोदर असल्याची खात्री करून घेतली. परंतु  योग्य उपचाराविना ही माकडीण प्रसूतिकळांनी ग्रस्त झाली आहे. सध्या ती प्रसूतीच्या असह्य वेदना सोसत असल्याचे विदारक चित्र आहे. बाळंतपणासाठी तिच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार होत नसल्याचेही दिसून येत आहे. 

शनिवारी सकाळी मार्केट यार्डाजवळ रस्त्यालगत निपचित अवस्थेत माकड पडून होते.प्राणीप्रेमी निसार नदाफ व सुनील अरळीकट्टी यांना हे माकड दिसले. त्यांनी ताबडतोब  पक्षीप्रेमी मुकुंद  शेटे यांच्याशी संपर्क केला. अ‍ॅनिमल राहतचे राकेश हे त्याच्या  उपचारासाठी धावून गेले. त्याला वनविभागाच्या स्वाधीन केले.वनविभागाने रितसर पत्रानुसार महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयात उपचारासाठी दाखल केले. प्राणीसंग्रहालयातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शुभांगी ताजणे यांनी उपचार व तपासणी करून हे माकड मादी असल्याचे स्पष्ट करत ती गर्भार असल्याचे सांगितले. 

या सर्व घडोमोडी झाल्यानंतर त्या गरोदर माकडीणीला ठेवायचे कुठे, असा प्रश्‍न पडला. कारण महात्मा गांधी प्राणीसंग्रहालयाच्या अधिकार्‍यांनी सेंट्रल झूच्या नियमानुसार बाहेरच्या प्राण्यांना प्राणीसंग्रहालयात ठेवण्यास नकार दिला. डॉ. ताजणे यांनी बोलताना सांगितले की, सेंट्रल झूच्या नियमानुसार कामकाज होत आहे. त्या माकडावर प्राणीसंग्रहालयाच्या मदतीनेच उपचार केले आहेत. गरोदर असल्याची शहानिशा करण्यात आली. वनविभागाच्या कर्मचार्‍यांना मोठा प्रश्‍न पडला असून  वनविभागातील आरएफओ निकेतन जाधव यांनी आपल्या घरामोर एका पिंजर्‍यात ठेवले आहे.