होमपेज › Solapur › पूरग्रस्तांसाठी प्रार्थना; शांतता संदेश!

पूरग्रस्तांसाठी प्रार्थना; शांतता संदेश!

Published On: Aug 23 2018 1:29AM | Last Updated: Aug 23 2018 12:47AMसोलापूर : प्रतिनिधी

‘ए अल्लाह, अगर हमसे गलती से भी कोई भूल हो गई है तो हमे  माफ कर दे, हमारे गलतीयोंकी सजा मासुमोंको मत दे, हम पर ऐसा कहर मत बरसा, इन बरबादियोंसे हमे बचा...’, अशी प्रार्थना आज शहर काझी मुफ्ती सय्यद अमजद अली काझी यांनी बकरी ईदची नमाज अदा करताना केली. शहर, जिल्ह्यात हा सण उत्साहात साजरा झाला.

बकरी ईदनिमित्ताने आज शहरात विविध ईदगाह मैदानावर सकाळी नऊच्या सुमारास नमाज अदा करण्यात आली. त्यावेळी केरळ येथील पूरग्रस्तांच्या रक्षणासाठी काझींसह सर्व मुस्लिमबांधवांनी अल्लाहकडे प्रार्थना केली. त्यावेळी शहर काझींनी कुर्बानीचा अर्थ उपस्थित जनसमुदायाला सांगत शांततेचा उपदेश केला. काझी म्हणाले की, केरळमध्ये झालेला प्रलय म्हणजे आपल्याकडूनच निसर्गाविरोधात होत असलेल्या चुका आहेत. त्यामुळेच हा कोप ओढावला आहे. मात्र त्या नकळत झालेल्या चुकांची माफी आपण अल्लाहकडे मागू. तो निश्‍चितपणे या प्रलयातून आपल्या केरळीबांधवांची सुटका करेल व पुन्हा आपल्या हातून निसर्गाविरोधात कोणते कृत्य होऊ नये यासाठी आपण दक्ष राहिले पाहिजे. केरळमधील पूरग्रस्तांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रत्येकाने शक्य होईल तितकी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी भारतीय सैन्यदलातील धारातीर्थी पडलेल्या जवानांनाही श्रध्दांजली वाहण्यात आली. ईदनिमित्त शाही आलमगीर मैदान, जुनी मिल कंपाऊंड आदिलशहा ईदगाह व आसार मैदान येथे सामूहिक नमाज पठण झाले. पावसामुळे रंगभवन चौकातील अहले हदीस ईदगाह मैदानावर चिखल झाल्यामुळे येथील नमाज पठण रद्द करण्यात आले. त्यामुळे येथील लोकांनी शेजारीच असलेल्या पानगल शाळेतील ईदगाह मैदानावर नमाज अदा केली. नमाज पठणाच्या वेळी वाहतुकीचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सर्व वाहतूक मार्गात सकाळी दोन तासांसाठी बदल करण्यात आला होता. स्वतः पोलिस आयुक्तांनी शहर काझी यांची भेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.