Tue, Feb 19, 2019 14:28होमपेज › Solapur › सत्ता काबीज केल्याशिवाय प्रश्‍न सुटणार नाहीत

सत्ता काबीज केल्याशिवाय प्रश्‍न सुटणार नाहीत

Published On: Jul 06 2018 1:35AM | Last Updated: Jul 06 2018 12:49AMसोलापूर : प्रतिनिधी

स्वातंत्र्यानंतरही आपले प्रश्‍न, आपल्या मागण्या त्याच आहेत. त्याची सोडवणूक झालेली नाही. आपले प्रश्‍न सत्ता काबीज केल्याशिवाय सुटणार नाहीत. त्यामुळे सत्ता काबीज करूया, असे आवाहन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर शहर-जिल्हा शाखेच्या वतीने हुतात्मा स्मृती मंदिर येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजता कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे समीउल्लाह शेख होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार विजयराव मोरे, ओबीसी महासंघाचे शंकरराव लिंगे, रविंद्र मोकाशी, कामगार नेते श्रीशैल गायकवाड, सम्राट मौर्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर, अ‍ॅड. भारती कोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, वंचितांची मोट बांधण्यासाठी आयोजिलेल्या या बैठकीला सभेचे स्वरूप आले आहे. याबद्दल आनंद वाटत आहे. सत्तर वर्षांच्या वाटचालीत अनेक समूहांना अनेक जाणिवा झाल्या, प्रदीर्घ अनुभवानंतर आज प्रत्येकजण संविधानाच्या मार्गाने गेले पाहिजे, असे म्हणत आहे. एकत्र येण्याची भावना समाजात निर्माण होत आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना समीउल्लाह शेख म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांना शासनकर्ती जमात व्हा, असा संदेश दिला होता. त्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे. 
प्राध्यापक लक्ष्मण माने म्हणाले, सर्व आलुतेदार, बलुतेदार यांनी एकत्र येऊन अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करावेत.

माजी आमदार विजयकुमार मोरे म्हणाले, देशात भयानक विषमता आहे. जनतेला घर नाही. काम नाही. आरोग्य सेवा मिळत नाही. गरिबांना न्याय मिळत नाही. हे बदलायचे असेल तर 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीला सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करा. या मेळाव्यास विविध जाती-धर्मातील नागरिक, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक अर्जुन सलगर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अंजली गायकवाड यांनी केले.