Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Solapur › वाळू उपशामुळे माण नदीपात्रात खड्डेच खड्डे

वाळू उपशामुळे माण नदीपात्रात खड्डेच खड्डे

Published On: May 15 2018 10:52PM | Last Updated: May 15 2018 10:32PMपंढरपूर : प्रतिनिधी

भीमा नदी पात्रातील वाळू उपसा करण्यावर बंदी घालण्यात आल्याने वाळूअभावी बांधकामे रखडली असली तरी माणनदी पात्रातून रात्रंदिवस  मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. येथील ग्रामपंचायत व महसूल प्रशासन यांच्या अर्थपूर्ण सहमतीने वाळू उपसा होत असल्याने माणनदी पात्रात खड्डेच खड्डे पडलेले असून लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे.  याकडे वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देवून अवैधवाळू उपसा थांबवावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

माणनदी पात्रात पावसाळा वगळता एरव्ही पाणी नसले तरी उजनी कालव्यातून उन्हाळी हंगामात पाणी सोडण्यात येत असल्याने या नदीपात्रातील वाळू बांधकामासाठी दर्जेदार मानली जात आहे. पंढरपूर तालुका व मंगळवेढा तालुक्याच्या सीमेवर माणनदी असल्याने या नदीपात्रातील वाळू उपसाकडे महसूल अथवा पोलिस प्रशासन जास्त लक्ष देत नाही अशी चर्चा सुरू आहे. 

त्यामुळेच तनाळी, शेटफळ, तावशी, चिचूंबे, सिद्धेवाडी, तसेच गुंजेगाव, मारापूर, घरनिकी, महमदाबाद या गावातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. महसूल प्रशासन व ग्रामपंचायतीला हाताशी धरून रात्रीच्यावेळी सर्रासपणे वाळू माफिया व सर्वसामान्य लोक वाळू उपसा करत आहेत असे बोलले जाते. 

जेसीबी व डंपिंग ट्रॉलीच्याद्वारे अधिक वाळू उपसा केला जात आहे. त्या खालोखाल बैलगाडीद्वारे वाळू उपसा होत आहे. शेटफळ, तनाळी येथे वाळू उपसा केल्याने नदीपात्रात मोठमोठी भगदाडे पडली आहेत. तर तावशी येथे रात्रभर वाळू उपसा सुरू राहत असल्याने तावशीतून मारापूरकडे नदीपात्रातून जाताना दुचाकीस्वार व वाहनधारकांना वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यातून जावे लागत आहे. तावशी येथे होणार्‍या वाळू उपशाकडे ग्रामपंचायत लक्ष देत नाही. त्यामुळे या ठिकाणाहून मोठी अवैध वाळू वाहतूक सुरु असल्याचे पात्रात पडलेल्या खड्ड्यावरून दिसून येते.

महसूल प्रशासन व पोलिसांना हाताशी धरून वाळूमाफिया माण नदीचे लचके तोडत आहेत. यामुळे पर्यावरणाची हानी होत असून अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्तेदेखील खराब झाले आहेत. या परिसरात घरांची बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असून बांधकामाजवळ वाळूंचा साठादेखील मोठ्या प्रमाणात केल्याचे दिसून येते.वाळू लिलावास विरोध करणार्‍या व अवैध वाळू उपसा होऊ नये म्हणून ठराव करणार्‍या तावशी ग्रामपंचायतीने  सुरू असलेल्या वाळू उपशाकडे दुर्लक्ष केले आहे अशी चर्चा आहे.