Fri, Jul 19, 2019 07:08होमपेज › Solapur › पंढरपूर नगरपालिकेचे स्वच्छता अ‍ॅप कार्यान्वित

पंढरपूर नगरपालिकेचे स्वच्छता अ‍ॅप कार्यान्वित

Published On: Dec 15 2017 2:47AM | Last Updated: Dec 14 2017 8:38PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

शासनाने सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानास पंढरपूर शहरात चांगला प्रतिसाद मिळत असून शहरात ज्याठिकाणी कचरा आहे अशा ठिकाणचे फोटो अथवा तक्रार स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून केल्यास तत्काळ तक्रारींची दखल घेऊन स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे न.पा.ने राबविलेल्या स्वच्छता अ‍ॅपवर समस्यांचा पाऊस पडत असला तरी समस्यांचे तत्काळ निराकरण केले जात आहे. त्यामुळे शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार आहे.

 स्वच्छतेबाबत शासनाकडून वेगवेगळे अभियान, कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात येतात. कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडून स्वच्छतेच्या तक्रारीसाठी मोबाईल अ‍ॅपची निर्मिती करण्यात आली आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या शहराची निवड करुन अस्वच्छतेसंदर्भातील तक्रारींची यात नोंद करावयाची आहे. या तक्रारींची दखल घेऊन नगरपालिकेकडून तत्काळ तक्रार नोंदविण्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात येत आहे. त्यामुळे हे स्वच्छता अ‍ॅप शहरासाठी स्वच्छतादूतच बनत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 4 जानेवारी 2018 पासून सुरु होणार्‍या सर्वेक्षणामध्ये पंढरपूर नगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे.

दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरीत श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या वर्षातून चार मोठ्या यात्रा भरतात. त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण होतो. अशावेळी या स्वच्छता अ‍ॅपचा वापर महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून मुख्याधिकारी अभिजित बापट, नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अ‍ॅप सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शहरात दैनंदिन स्वच्छता राखण्याबाबत स्वच्छता विभागाला सजग राहावे लागणार आहे. 

स्वच्छता अ‍ॅप सुरु केल्यामुळे शहरातील शहरातील अनेक नागरिकांकडून स्वच्छता अ‍ॅप मोबाईलमध्ये घेण्यात येत आहे. हा अनोखा उपक्रम नागरिकांच्या पसंतीचा ठरला आहे. तक्रार दाखल होताच आरोग्य विभागाकडून त्वरित दखल घेण्यात येत आहे. त्यामुळे तक्रार करणार्‍या व्यक्तीला तत्काळ आपली तक्रार निवारण झाली की नाही याची माहिती मिळत आहे.  स्वच्छतेच्या अ‍ॅपमुळे अस्वच्छ झालेले पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर होण्यास नक्कीच मदत होणार आहे.