Mon, Nov 19, 2018 04:20



होमपेज › Solapur › झारखंड व्यापाऱ्यांकडून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची लुट

झारखंड व्यापाऱ्यांकडून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची लुट

Published On: Dec 14 2017 4:14PM | Last Updated: Dec 14 2017 4:14PM

बुकमार्क करा





लक्ष्मी दहिवडीः प्रमोद बनसोडे 

मंगळवेढा व सांगोला तालुक्यात डाळिंबांचे उत्पादन फार मोठ्या प्रमाणात वाढत असून, हे डाळिंब खरेदी करण्यासाठी सांगोला येथे झारखंडसह इतर व्यापारी मोठ्या प्रमाणात आले आहेत. या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लुट व फसवणूक होत असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.  या प्रकाराकडे सांगोला पोलिसांनी लक्ष देवून कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या शेतातील डाळिंब विक्रीसाठी मार्केट यार्ड व मोठ्या बाजार पेठेत न घेऊन जाता शेतातच डाळिंब तोडून वजन करून व्यापाऱ्याला विकत आहेत. सांगोला तालुक्यात झारखंड, केरळ व राजस्थान आदी भागातील व्यापारी राहत असून, सांगोल्यातील ठराविक एजंटला जवळ धरून शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेची पाहणी करून तो माल विकत घेतात पण तो माल ज्या प्रमाणे ठरवला जातो, त्या प्रमाणे व्यापारी विकत घेत नाहीत. उलट शेतकऱ्यांनी माल काढला की खराब होऊन जाईल. अशी भीती घालून ठरविल्याप्रमाणे माल न घेता त्या मालाला नावे ठेवून माल खरडा, डाळिंबावर काळे डाग आहेत, कुजवा आहे, असे शेतकऱ्यांनी झाडाचे डाळिंब तोडल्यावर सांगतात. अशा वेळी जो मद्यस्थ एजंट असतो त्याला व्यापारी एका किलो मागे ठराविक रक्कम कमिशन म्हणून देत असल्यामुळे तेही व्यापाऱ्यांच्या बाजुने बोलत आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांची लुट व फसवणुक होत आहे. एकीकडे डाळिंबाला दर नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, दुसरी कडे शेतकऱ्यांना फसवून व्यापारी डाळिंब खरेदी करीत आहेत.

बाजारात माल विक्रीला घेऊन जाण्यासाठी होणारा वाहतुक खर्च व वेळ वाचावा यासाठी अनेक शेतकरी डाळिंब आपल्या शेतातच व्यापाऱ्यांना विकतात. माञ, काही वेळा व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना रोख स्वरुपात पैसे न देता चेक दिले जातात. माञ, दिलेल्या तारखेला चेक बॅकेत जमा केले तर ते चेक खात्यावर पैसे नसल्यामुळे चेक बॉन्स झाले असल्याचे शेतकरी वर्गातुन बोलले जात आहे. या प्रकाराबाबत शेतकरी तक्रार करण्याच्या भानगडीत पडत नसल्यामुळे बाहेरील व्यापाऱ्यांचे चांगलेच अच्छे दिन येत आहेत. शेतकऱ्यांची होणारी ही फसवणूक थांबविण्यासाठी योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.

 झारखंड येथील व्यापाऱ्यांनी माझी डाळिंबांची बाग पाहिली. माल २४ रूपये किलो प्रमाणे देण्याचे ठरले. यावेळी फुट पंक्चर, कुजवा डॅमेज असलेला माल न घेण्याचे ठरले होते. माञ, डाळिंब तोडल्यावर त्यांनी आम्ही फक्त एक्सपोर्ट डाळिंब व एक डाग नसलेले घेणार असे म्हणुन चांगला माल घेण्यास सुरवात केली यावेळी मी तो माल त्यांना विकला नाही. तो मी वाहन करून सांगोला येथे पाठविला. व्यापाऱ्यांच्या या वृत्तीमुळे शेतकऱ्यांना नाहक ञास व नुकसान होत आहे. 


    विठ्ठल येसू बनसोडे, लक्ष्मी दहिवडी डाळिंब उत्पादक शेतकरी.