Thu, Jul 18, 2019 02:23होमपेज › Solapur › सोलापुरात धावणार प्रदूषणमुक्‍त ई-रिक्षा

सोलापुरात धावणार प्रदूषणमुक्‍त ई-रिक्षा

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 9:03PMसोलापूर : प्रतिनिधी

बॅटरीवर चालणारी प्रदूषणमुक्‍त ई-रिक्षा रविवारपासून सोलापूरच्या रस्त्यावर धावणार असल्याची माहिती पक्षकार संघाचे राज्य सहसचिव बसवराज येरनाळे यांनी दै. ‘पुढारी’ला दिली. 

नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांनी 24 जानेवारी 2018 रोजी ‘ई-रिक्षा व ई-कार्ट’ या वाहनांची नोंदणी करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार सोलापूर परिवहन कार्यालयाने स्थानिक ऑटोमोबाईल्सच्या पहिल्या प्रवासी वाहतूक करणार्‍या ई-रिक्षास नोंदणी क्रमांक दिला असून ती ई-रिक्षा आता रस्त्यावर धावण्यास सज्ज झाली आहे. प्रदूषणमुक्‍त ई-रिक्षास महाराष्ट्र शासनाच्या 14 फेब्रुवारी 2018 रोजीच्या निर्णयानुसार ई-रिक्षा व ई-कार्ट  या वाहनांना 12 हजार रुपये कमाल अनुदान तसेच कर माफ असल्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे सदर ई-रिक्षास शासनाने परमीटदेखील माफ केलेले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या जुलै 2017 मधील निर्णयाच्या आधारे, केंद्रीय परिवहन मंत्रालयाने सर्व राज्यांना दिलेल्या सूचनेनुसार रिक्षा, टॅक्सी व ई-रिक्षा चालविण्यासाठी व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्सची यापुढे गरज लागणार नाही, असेही यावेळी स्पष्ट केले आहे तसेच ई-रिक्षा व ई-कार्ट खरेदीसाठी कोणत्याही प्रकारचे परमीट, लायसन्स, बिल्ला आदींची आवश्यकता नसणार आहे. 

या रिक्षामुळे रस्त्यावरील प्रदूषण कमी होणार असल्याने या नवीन उपक्रमाचे शहरवासियांना औत्सुक्य आहे. या पत्रकार परिषदेस शिवाप्पा कोट्टलगी, साजिद सय्यद आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

चार्जिंगसाठी सार्वजनिक पॉईंटला परवानगी

ही ई-रिक्षा चार्जिंग करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पार्किंग क्षेत्र, निवासी क्षेत्र, सोसायट्या, बस डेपो, रेल्वे स्टेशन आणि पेट्रोल पंप याठिकाणी सार्वजनिक चार्जिंग पॉईंट म्हणून परवानगी दिली आहे. याबाबत नागरिकांनी संबंधित विभागाकडे अर्ज केल्यास 15 दिवसांच्या आत चार्जिंग पॉईंटला परवानगी मिळणार आहे तसेच चार्जिंगचा खर्च केवळ 20 ते 25 रुपये असून एखादी बॅटरी चार्ज केल्यानंतर ई-रिक्षा 90 ते 100 किलोमीटर अंतर धावते.