पंढरपूर : नवनाथ पोरे
पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांची 18 मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर तीन दिवस पंढरपुरात दहशतीचे सावट पसरले होते आणि पंढरपूरकर अस्वस्थ झाले होते. या दहशतीला, गुंडगिरीला आणि पोलिसांच्या निष्क्रियतेला आ. भारत भालके यांनी विधानसभेतही आवाज उठवून वाचा फोडली होती. त्यानंतर दहशतीखाली दबलेल्या पंढरपूरकरांना विश्वास देण्यासाठी कोल्हापूर पोलिस परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हे पंढरीत आले होते आणि यावेळी त्यांनी कोणताही दादा कायद्यापेक्षा मोठा नाही, तर पोलिस हेच दादा आहेत आणि गुंडगिरीला आळा घालू, फळकूट दादांचा बंदोबस्त करू, अशी घोषणा केली होती. यावेळी नांगरे-पाटील यांनी स्थानिक नागरिक, व्यापारी, पत्रकारांशीही संवाद साधला होता. थोड्याच दिवसांत पोलिसांचे काम दिसून येईल, असा विश्वासही नांगरे-पाटील यांनी यावेळी नागरिकांना दिला होता.
त्यानुसार गेल्या आठ दिवसांत पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था पूर्वपदावर आणली आहे. पहिल्या फळीतील गुंडांना आळा घालण्याकरिता 23 कुख्यात लोकांचे तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेले आहेत. या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असून त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आणखी 27 लोकांचे 10 दिवसांसाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत. काही दिवसांत या प्रस्तावांना मंजुरी मिळेल आणि या लोकांना तडीपार केले जाईल, असे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांनी सांगितले.
संदीप पवार खूनप्रकरणात आजवर 12 आरोपींना अटक केली असून हे आरोपी पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी संदीप अधटराव आणि विकी मोरे या दोघांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान नावे निष्पन्न झालेल्या आणखी 6 आरोपींचाही पोलिस शोध घेत आहेत. त्यामुळे संदीप पवार खून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.
पंढरपूर शहरातील मुली व महिलांच्या छेडछाडीविरोधातही नागरिकांनी, महिलांनी तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे जिल्हा महिला दक्षता पथक आणि तक्रार निवारण केंद्राच्या पोलिस उपनिरीक्षक प्रीती जाधव यांना पंढरपूरमध्ये कारवाईसाठी नियुक्त करण्यात आले आहे. जाधव यांनी त्यांच्या पथकासह आल्यापासून जोरदार मोहीम उघडत 31 रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. त्यामुळे एकूणच पंढरपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिसांनी गुंड आणि फळकूट दादांविरोधात खाकी दादागिरी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
संदीप पवार खूनप्रकरणात आजवर 12 आरोपींना अटक केली असून हे आरोपी पोलिस कोठडीत आहेत. मुख्य आरोपी संदीप अधटराव आणि विकी मोरे या दोघांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान नावे निष्पन्न झालेल्या आणखी 6 आरोपींचाही पोलिस शोध घेत आहेत.
पहिल्या फळीतील गुंडांना आळा घालण्याकरिता 23 कुख्यात लोकांचे तडीपारीचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेले आहेत. या प्रस्तावांना लवकरच मंजुरी मिळणार आहे. त्यानंतर 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होत असून त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता आणखी 27 लोकांचे 10 दिवसांसाठी तडीपारीचे प्रस्ताव तयार केले आहेत.
Tags : Pandharpur, police, crime