Sun, Jul 21, 2019 08:06होमपेज › Solapur › पोलिसांच्या कामाचे मोजमाप झाले पाहिजे

पोलिसांच्या कामाचे मोजमाप झाले पाहिजे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

पोलिस सेवा ही खडतर सेवा असून पोलिसांचे आयुष्यच खडतर आहे. सर्व परिस्थितीमध्ये पोलिस दल हे कार्यरत असते. त्यामुळे पोलिसांच्या कामाचे मोजमाप झाले पाहिजे, असे मत पोलिस उपायुक्‍त नामदेव चव्हाण यांनी व्यक्त केले.

सोलापूर शहर पोलिस आयुक्‍तालयाचे  पोलिस  आयुक्‍त महादेव  तांबडे, सहायक फौजदार संजय खरात, पोलिस हवालदार संजय हुंडेकरी यांना 26 जानेवारी 2017 रोजी राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले आणि 27 मार्च 2018 रोजी मुंबई येथे एका समारंभात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते ते प्रदान करण्यात आले. त्यामुळे सोलापूर शहर पोलिस  आयुक्‍तालयाच्यावतीने राष्ट्रपती पदक मिळालेल्यांचा सत्कार समारंभ शनिवारी दुपारी पोलिस आयुक्‍तालयात पार पडला. त्यावेळी उपायुक्‍त चव्हाण बोलत होते. यावेळी आयुक्‍त तांबडे यांच्या पत्नी विमल तांबडे, मुलगा वैभव तांबडे उपस्थित होते. याप्रसंगी शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय  पक्ष, प्रतिष्ठित  मंडळी, पोलिस अधिकारी यांच्याकडूनही  सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना आयुक्‍त महादेव तांबडे म्हणाले की, शासनाकडून कोणतेही पदक अगर बक्षीस घ्यायचे असेल तर आपली सेवा निष्कलंक असली पाहिजे. पदक किंवा बक्षीस मिळाले तर कर्मचारी किंवा अधिकार्‍याला आणखी चांगले काम करण्यासाठी प्रेरणा मिळते.  त्यामुळे यंदाच्या वर्षी आयुक्‍तालयातील 15 जणांच्या नावाची शिफारस राष्ट्रपती पोलिस पदकासाठी पाठविण्यात आली असून 38 जणांच्या नावाची शिफारस ही पोलिस महसंचालकांच्या सन्मानचिन्हासाठी पाठविण्यात आल्याचेही तांबडे यांनी सांगितले.

यावेळी हवालदार हुंडेकरी यांनी आजपर्यंत आपण केलेल्या चांगल्या सेवेचे फलित झाल्याचे सांगितले. या कार्यक्रमाची प्रस्तावना सहायक पोलिस आयुक्‍त शर्मिष्ठा घारगे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी केले. यावेळी शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रताप चव्हाण, परिवहन सभापती तुकाराम मस्के, विजय पुकाळे, नगरसेवक गुरुशांत धत्तुरगावकर, महेश धाराशिवकर, शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत, शाम कदम, माऊली पवार, राजन जाधव, चेतन चौधरी, रसूल पठाण, अरुण भालेराव यांच्यासह नागरिक, पोलिस अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags ; Solapur, Solapur News,  Police service, tough service, Police life, tough one, Police teams,  works,  conditions  


  •