Wed, Mar 20, 2019 22:54होमपेज › Solapur › पंढरपुरात पोलिसांनीच केला गनिमी कावा

पंढरपुरात पोलिसांनीच केला गनिमी कावा

Published On: Jul 22 2018 11:59PM | Last Updated: Jul 22 2018 11:51PMपंढरपूर : नवनाथ पोरे

मराठा - धनगर आरक्षणाच्या प्रश्‍नावरून निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलकांना गनिमी काव्याचा इशारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात पोलीसांनीच गनिमी कावा करून आंदोलनातील हवा काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे पोलीसांच्या या गनिमी काव्यामुळे आंदोलकही हवालदील झाले होते मात्र नंतर आंदोलकांनी प्रतिहल्ला करीत गनिमी कावा निष्प्रभ केला. 

पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या महापूजेला येणार्‍या मुख्यमंत्र्यांना रोखण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण कृती समितीने दिला होता. तसेच गनिमी काव्याने मुख्यमंत्र्यांना अडवणार असल्याचाही इशारा दिला होता. आषाढी यात्रेसाठी 12 ते 15 लाख भाविक येण्याची शक्यता असता गनिमी काव्याने, वारकर्‍यांच्या गर्दीतून कोणताही गैरप्रकार होऊ शकतो हे लक्षात घेऊन पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. त्यांनी आंदोलन थांबवण्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न केले मात्र आंदोलक थांबत नाहीत हे स्पष्ट झाले. अखेरीस पोलीसांनी मराठा क्रांती मोर्चाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचा अपयशी प्रयत्न केला. या दरम्यान पोलीसांनी आंदोलकांपैकी रामभाऊ गायकवाड यांचा मोबाईल जप्त केला होता.  मात्र आ. भारत भालके यांनी दोन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात न घेऊन देता पोलीसांच्या ताब्यातून पळवून नेले होते. 

या दरम्यान रामभाऊ गायकवाड यांचा मोबाईल पोलीसांकडेच होता. त्या मोबाईलवरून पोलीसांनी रामभाऊ गायकवाड यांच्या फेसबूकवर जाऊन पंढरपूर येथील आंदोलन स्थगित करण्यात येत आहे अशा प्रकारची पोष्ट केली. तशीच ती पोष्ट गायकवाड यांच्या व्हॉटस अ‍ॅपवरून त्यांच्याशी संबंधित सर्व फेसबूक ग्रूपला आणि आंदोलनाशी संबंधित कार्यकर्त्यांना फॉरवर्ड केली. त्यामुळे 21 जुलैच्या रात्रीच आंदोलन माघारी कसे काय घेतले ? गायकवाड यांनी अशी पोष्ट का टाकली याबाबत एकमेकांना विचारणा केली जाऊ लागली. आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला होता. 

दरम्यान पोलीसांनी अशा प्रकारे आपल्या फेसबूक अकौंटवरून खोटी, अफवा पसरवणारी पोष्ट टाकल्याचे गायकवाड यांना समजले. त्यानंतर त्यांनी दुसर्‍या मोबाईलवरून आपल्या फेसबूक अकौंटवर जाऊन पोलीसांच्या कारनाम्याची पोलखोल केली. आंदोलन मागे घेतले गेले नाही तर पोलीसांनी मोबाईल जप्त केला असून त्या मोबाईलवून अशा पोस्ट पसरवल्याचे गायकवाड यांनी फेसबूकवरूनच पोष्ट टाकून जाहीर केले. दरम्यान पोलीसांनी गायकवाड यांच्या फेसबूक ग्रूपवर सक्रिय असलेल्या काही आंदोलक कार्यकर्त्यांनाही डिलीट आणि अनफ्रेंड करून गायकवाड यांच्या पोष्टना, पोस्ट प्रसारणाला आळा घालण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांमध्ये पोलीसांच्या या गनिमी काव्याची चर्चा मात्र चांगली रंगली असून सायबर क्राईमच्या अभ्यासात निष्णात असलेल्या पोलीसांनी केलेला गनिमी काव्याच्या हल्ल्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक काही तास तरी गोंधळले होते. पोलीसांच्या या कल्पकतेचेही सर्व सामान्यांतून मात्र कौतूक होत आहे.