होमपेज › Solapur › ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये पोलिसांकडून तोडफोड (Video)

ट्रॅव्हल्स ऑफिसमध्ये पोलिसांकडून तोडफोड (Video)

Published On: Mar 04 2018 1:38AM | Last Updated: Mar 04 2018 9:24AMसोलापूर : प्रतिनिधी

मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या एका टॅ्रव्हल्सच्या कार्यालयात  रात्रगस्तीसाठी असलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाने दबंगगिरी करीत कार्यालयातील खुर्च्या व टेबलवरील काच फोडून टाकली. ही घटना शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली. याबाबत शनिवारी दुपारी बसपाच्या वतीने आयुक्‍तांना निवेदन देऊन पोलिस अधिकार्‍यावर कारवाईचे निवेदन देण्यात आले. परंतु, यावर वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी चर्चा होऊन चौकशीसाठी संबंधित अधिकार्‍यांना बोलावल्याचे सांगण्यात आल्याने यावर पडदा पडला.

रात्रगस्तीसाठी असणार्‍या सहायक पोलिस निरीक्षक रोहित दिवसे यांना शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खासगी टॅ्रव्हल्सचे ऑफिस उघडे दिसले. त्यामुळे त्यांनी टॅ्रव्हल्सच्या  ऑफिसमध्ये  घुसून   खुर्च्या फेकून  देऊन  टेबलवरील काचा  फोडून तोडफोड केली. यावेळी ऑफिसमध्ये असलेल्या दोन महिला प्रवासी घाबरून ऑफिसमधून बाहेर गेल्या. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दिवसे यांनी ट्रॅव्हल्सच्या ऑफिसचे शटर स्वतः उघडून ते बंद केले. हा सर्व प्रकार ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून ट्रॅव्हल्स ऑफिसच्या  मालकांनी हे सीसीटीव्हीचे चित्रीकरण वरिष्ठ  पोलिस अधिकार्‍यांना पाठवून दिले. 

दरम्यान, शनिवारी दुपारी बसपाच्या वतीने प्रभारी अ‍ॅड. संजीव सदाफुले, जिल्हाध्यक्ष आप्पा लोकरे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, नगरसेविका स्वाती आवळे, उमेश पवार, बबलू गायकवाड, सचिन वाघमारे, अमर भालेराव, समाधान आवळे, सचिन गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौकात ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारे व्यावसायिक यांनी आयुक्‍त महादेव तांबडे यांना सहायक पोलिस निरीक्षक दिवसे यांच्यावर कारवाई    करण्याबाबत निवेदन दिले.