होमपेज › Solapur › लाचखोरीत पोलिस व महसूल कर्मचार्‍यांची बाजी

लाचखोरीत पोलिस व महसूल कर्मचार्‍यांची बाजी

Published On: Jul 24 2018 11:28PM | Last Updated: Jul 24 2018 11:12PMसोलापूर ः रामकृष्ण लांबतुरे 

तंत्रज्ञान वाढले, लोकांना कायदे माहीत झाले, असे म्हणताना लाचखोरी कमी होईल असे एक सकारात्मक चित्र जाणकांराना दिसत होते. मात्र झाले उलटेच. लाचेचा राक्षस अधिकच मोठा होऊ लागला आहे. या राक्षसाला संपवण्यासाठी पीडितांनी समोर येऊन एसीबीला तक्रार करण्याची गरज आहे. 

अख्खी कार्यालयेच संगनमताने लाच घेतल्याशिवाय सामान्य माणसांचा कागद पुढे सरकवत नाहीत, हे यापूर्वी झालेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.  सर्वात आश्‍चर्याची बाब म्हणजे सर्वसामान्यांचा सर्रास संबंध येणार्‍या पोलिस आणि महसूल प्रशासनाने या लाचखोरीत ‘अव्वल’ क्रमांक मारला आहे. काम कुणाचेही असो, लाच दिल्याशिवाय करायचे नाही, असे बहुतांश सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांनी पक्के ठरवले आहे की काय, अशी शंका येण्यासारखे प्रकार समोर येत आहेत. लाच दिली तरच काम अन्यथा त्रुटी काढून ते  रद्द करण्यासारख्या गंभीर तक्रारी  होत आहेत.  

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा जोरदार कारवाई केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत पाच टक्क्याने वाढ होऊन  1 जानेवारी  ते  20 जुलै या कालावधीत एसीबीचे 23  सापळे यशस्वी झाले आहेत. यात विविध विभागांतील 30 लाचखोरांना ताब्यात घेतले आहे.   कारवाई वाढत असूनही लाचखोरांनी मात्र यातून फारसे शहाणपण घेतलेले दिसत नाही

एसीबीच्या एका कारवाईत शक्यतो एकजण लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडतो असे चित्र असते, पण एसीबीच्या यापूर्वी झालेल्या कारवाईवर नजर टाकली तर सामूहिक  कारवाईत अधिक मासे गळास लागले आहेत. 

पंढपूरमध्ये सामूहिक सापळा रचून एमईसीबीने दोन कार्यकारी उपअभियंते, सोलापुरात पाटबंधारे खात्यात अधीक्षक अभियंता आणि लेखापरिक्षकाला ताब्यात घेतले. अशीच कारवाई कुर्डुवाडी, मंगळवेढ्यातही केली आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील लाचखोरीच्या या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी एसीबीचे पोलिस उपाधीक्षक अरूण देवकर, पोलिस निरीक्षक जगदीश भोपळे, कविता मुसळे, एएसआय श्रीरंग सोलनकर, नीलकंठ जाधवर, हवालदार प्रवीण बिराजदार, चंद्रकांत पवार, संजय बिराजदार, पोलिस नाईक कैलास भाजीभाकरे, सुनील चव्हाण, पद्मनाथ चक्‍कापोलो, प्रफुल्ल जानराव, संतोष वाघमारे, निलेश शिरोळे, सिद्धू देशमुख ही टीम कार्यरत आहे.  

 23 सापळ्यांत 30 लाचखोर जाळ्यात   

सोलापूर एसीबीने लावलेल्या 23 सापळ्यांत तब्बल 30 लाचखोर अडकले असून महसूल 6, पोलिस  5, पाटबंधारे 5, जिल्हा परिषद 4, एमईसीबी 3, सहकार क्षेत्र 2, पणन 2, शिक्षण 1, समाजकल्याण 1,  खासगी 1 यांचा समावेश आहे. पुणे विभागात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर असे पाच युनिट येतात. या पाचही युनिटमध्ये सोलापूर एसीबीचा क्रमांक अव्वल आहे.