Wed, Apr 24, 2019 07:41होमपेज › Solapur › मटका, जुगारावर शहर पोलिसांची कारवाई; 13 गुन्हे दाखल

मटका, जुगारावर शहर पोलिसांची कारवाई; 13 गुन्हे दाखल

Published On: Feb 07 2018 11:17PM | Last Updated: Feb 07 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी

पोलिस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध गॅस विक्री, मटका व जुगार अड्ड्यांवर  शहर पोलिसांनी दोन दिवसांपासून कारवाई सुरु केली आहे. गेल्या दोन दिवसांत याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांत 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1 लाख 22 हजारांचा  मुद्देमाल जप्त केला आहे. 

सुनीलनगर ते कलावतीनगर रस्त्यावरील जाधव टॉवेल कारखान्याच्या  बाजूस  सचिन   शरणप्पा  कोळी (वय 24, रा. कलावतीनगर, सोलापूर) यास मटका घेताना अटक करुन त्याच्याकडून  रोख 742 रुपये जप्त केले. जुना अक्क्‍लकोट नाका येथील संभाजी कारखान्याजवळ मनोहर सोमय्या बिरू (वय 44, रा. सग्गमनगर, मुळेगाव) यास पकडून त्याच्याकडून 892 रुपये व चिठ्ठ्या जप्त केल्या. नई जिंदगीमधील शिवगंगानगरातील कमर हॉलच्या बाजूला शाहनवाज अब्दुल करीम मुल्ला (वय 43, रा. शिवगंगानगर भाग 1, सोलापूर) यास अटक करुन त्याच्याकडून 405 रुपये रोख आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. अमन चौक ते मजरेवाडी रोडवरील पटेल पान शॉपच्या बाजूला नासिर निजाम पटेल (वय 55, रा. सिध्देश्‍वरनगर भाग 4, नई जिंदगी, सोलापूर) यास अटक करुन त्याच्याकडून 1622 रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. याबाबत एमआयडीसी पोलिस  ठाण्यात  गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. 

बाळी वेस बस स्टॉपववळ रवी मच्छिंद्र तळभंडारे (वय 28, रा. सम्राट चौक, सोलापूर) यास मटका घेतान पकडून त्याच्याकडून 505 रुपये रोख व चिठ्ठ्या, प्रभाकर महाराज मंदिराजवळील सूर्योदय किराणा दुकानाजवळ तानाजी बाबुराव जाधव (वय 65, रा. प्रभाकर वस्ती, सम्राट चौक, सोलापूर) यास पकडून त्याच्याकडून 1605 रुपये जप्त केले. याबाबत  जोडभावी  पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हुमा मेडिकलच्या बोळात संतोष रतन जाधव (वय 40, रा. माजी महापौर बंगल्याजवळ, जगदंबा मंदिरजवळ, सोलापूर) यास मटका घेताना पकडून त्याच्याकडून 3515 रुपये रोख, शार्दुलकांत गजानन घोलप (वय 55, रा. कल्याणनगर, सोलापूर) यास पकडून त्याच्याकडून 1805 रुपये रोख, संगमेश्‍वर पब्लिक स्कूलजवळ नरेश अशोक शिंदे (वय 30, रा. मौलाली चौक, सोलापूर) यास पकडून त्याच्याकडून 210 रुपये  जप्त केले. याबाबत सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

होटगी रोडवरील कुमठा नाका रिक्षा स्टॉपजवळ नामदेव शिवगोंडा कांबळे (वय 66, रा. सिध्देश्‍वर साखर कारखाना, सोलापूर) यास पकडून त्याच्याकडून 165 रुपये रोख जप्त करुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. देगाव रोडवरील माऊली हेअर कटिंगच्या कट्ट्यावर मटका घेणार्‍या माऊली तानाजी शिंदे (वय 30, रा. कोयनानगर, सोलापूर) यास पकडून 360 रुपये जप्त करण्यात आले. याबाबत सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील गुड्डी मेडिकलशेजारी मटका घेताना विनायक आनंदराव साखरे (वय 51, रा. भारतरत्न इंदिरानगर, सोलापूर) आणि इस्माईल मुच्छाले (रा. सोलापूर) या दोघांना पकडून त्यांच्याकडून 3620 रुपये रोख जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मजरेवाडी क्रॉस रोड ते अमन चौककाडे जाणार्‍या रस्त्यावर इम्रान युन्नूस शेख (वय 38, रा. सिध्देश्‍वरनगर भाग 2, नई जिंदगी, सोलापूर) यास मटका घेताना पकडून त्याच्याकडून 412 रुपये रोख व चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 सेटलमेंट कॉलनीतील जुगार अड्ड्यावर छापा
सेटलमेंट फ्री कॉलनी नं. 1 येथील प्रदीप चंद्रकांत गायकवाड यांच्या घरासमोरील पत्राशेडमध्ये असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मंगळवारी दुपारी छापा मारुन जुगार खेळणार्‍या 9 जणांना अटक करुन त्यांच्याकडून रोख रकमेसह 1 लाख 6 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी विष्णू दत्तात्रय वाघमारे (वय 60, रा. अभिमानश्रीनगर, मुरारजी पेठ, सोलापूर) याच्यासह 9 जणांना अटक केली. याबाबत सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.