Wed, Aug 21, 2019 14:57होमपेज › Solapur › भारतीय संस्कृती जगाला आदर्शवत ठरणारी : तांबडे

भारतीय संस्कृती जगाला आदर्शवत ठरणारी : तांबडे

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 9:04PM सोलापूर : प्रतिनिधी

विदेशातील घटस्फोटांचे प्रचंड प्रमाण पाहता भारतातील एकत्र कुटुंबपद्धती पर्यायाने भारतीय संस्कृती ही जगाला आदर्शवत ठरणारी आहे, असे प्रतिपादन पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी केले.
मार्कंडेय सोशल फाऊंडेशनतर्फे विवाहाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या 50 सर्वधर्मीय दाम्पत्यांचा आहेर देऊन सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विभागीय उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, मनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे, विधीज्ञ रामदास सब्बन, नगरसेवक आनंद चंदनशिवे, शशिकांत केंची, नागेश कोंडा, फाऊंडेशनचे अध्यक्ष गौरीशंकर कोंडा, आनंद बिर्रू, श्रीनिवास कामुर्ती, अशोक आवार, व्यंकटेश पडाल आदींची प्रमुख उपस्थित होती. तांबडे पुढे म्हणाले, पूर्वी कौटुंबिक वाद हे समाजातील ज्येष्ठ वा पंच मंडळी मिटवायची, पण ते काम आता पोलिस करीत आहेत.

गेल्या वर्षभरात सोलापुरातील 550 दाम्पत्यांचे मोडणारे संसार पोलिसांनी वाचविले. जसजशी प्रगती होत चालली  आहे तसतशी सामाजिक मूल्यांची होणारी घसरण ही चिंतनीय बाब आहे. ही घसरण रोखण्यासाठी समाजातील आदर्श व्यक्तींची प्रेरणा घेणे गरजेचे आहे, असे आवाहन तांबडे यांनी केले.

चंद्रकांत गुडेवार म्हणाले, उच्चशिक्षितांमध्ये घटस्फोटांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. ही बाब समाजाच्यादृष्टीने चांगली नाही. पती-पत्नीच्या यशस्वी संसारासाठी परस्पर विश्‍वास व त्यागाची भावना आवश्यक आहे. मार्कंडेय फाऊंडेशनने विवाहाची 50 वर्षे पूर्ण केलेल्या दाम्पत्यांचा सन्मान करुन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. डॉ. ढाकणे म्हणाले, भौतिक प्रगती साधत असताना घटस्फोटाचे वाढते प्रमाण सर्वश्रृत आहे. अगदी लहानसहान गोष्टींवरुन घटस्फोट होत आहेत. सासू-सासरे नकोशी झाली आहेत. म्हणूनच की काय वृद्धाश्रम वाढत आहेत. हे संस्कार कमी होत चालल्याचे निदर्शक आहे. यशस्वी संसारासाठी दाम्पत्यांमध्ये परस्पर सामजंस्य, चुका सुधारण्याची वृत्ती हवी, असे मत डॉ. ढाकणे यांनी व्यक्त केले.

महेश कोठे म्हणाले, पूर्वीच्या काळी चांगले संस्कार असल्याने कुटुंब व्यवस्था नीट होती, पण हळूहळू संस्कार कमी होत चालल्याने कौटुंबिक समस्या वाढीला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. आपण चांगले वागलो तर पुढची पिढी नीट वागेल, हा विचार प्रत्येकाने अंगीकारण्याची आवश्यकता आहे.

 प्रारंभी आनंद बिर्रू यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वैष्णवी पोला व संदीप क्षीरसागर यांनी केले. आभार व्यंकटेश पडाल यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास रच्चा, श्रेष्ठा अ‍ॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.