Sun, Jul 21, 2019 16:12
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › प्लास्टिकबंदी : ग्रामीण भागातही कारवाई सत्र

प्लास्टिकबंदी : ग्रामीण भागातही कारवाई सत्र

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 11:12PMसोलापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात प्लास्टिकचा वापर न करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे  ग्रामपंचायतीच्या परिसरात प्लास्टिकचा वापर होत असल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे अधिकार ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिली. 

प्लास्टिकचा वापर आरोग्यासाठी व पर्यावरणासाठी कसा घातक आहे, कायदा का करण्यात आला आहे, प्लास्टिकबंदी कायद्याने काय कारवाई होऊ शकते, याची माहिती काही दिवसांपूर्वीच जिल्हास्तरीय कार्यशाळेत ग्रामसेवक व सरपंचांना देण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सर्वच लोकप्रतिनिधी व अंमलबजावणी यंत्रणेस मार्गदर्शन करण्यासाठी प्लास्टिकमुक्‍तीवर जनजागृती पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

माळशिरस, पंढरपूर, मोहोळ यासारख्या तालुक्यातील मोठ्या  ग्रामपंचायतीमधील परिसरात होणार्‍या प्लास्टिकच्या वापराविरोधात कारवाई करण्याचे सत्र सुरु करण्यात आले आहे. बुधवारी कारवाईचे स्वरुप समोर येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागातील नागरिकांना पहिल्यांदा या कायद्याचे महत्त्व पटवून, त्यांना स्वत:हून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रबोधन करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेकडून होत आहे. 

जनजागृती पंधरवडा कार्यक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यात व गावागावांत या उपक्रमांतर्गत गावकर्‍यांचे प्रबोधन करण्यात येत असून, त्यांची प्लास्टिकमुक्‍तीसाठी मानसिकता निर्माण करण्याची भूमिका जिल्हा परिषदेने घेतली आहे, असेही ते म्हणाले.