होमपेज › Solapur › मला, पालकमंत्र्यांना संपविण्याचा घाट!

मला, पालकमंत्र्यांना संपविण्याचा घाट!

Published On: Jun 28 2018 11:56PM | Last Updated: Jun 28 2018 9:55PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समिती निवडणुकीच्या दृष्टीने सहकारमंत्री आणि माजी आ. दिलीप माने यांच्यात मोठी चुरस निर्माण झाली असून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच गुरुवारी माने यांनी पत्रकार परिषद घेऊन, सहकारमंत्र्यांनी सध्या मला आणि पालकमंत्र्यांना संपविण्याचा घाट घातल्याचा घणाघाती आरोप केला. त्यांना पालकमंत्रिपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. आम्हाला अटक करण्यासाठी त्यांनी पोलिसांवरही दबाव आणला होता, असेही माने यांनी याप्रसंगी सांगितले. 

दिलीप माने म्हणाले, सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सध्या जिल्ह्यात सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांच्याकडे असणार्‍या अधिकाराचा गैरवापर करून त्यांनी आमच्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे गुन्हे दाखल केले. तसेच आम्हाला अटक करण्यासाठी पोलिस प्रशासनावर दबावही टाकला. परंतु त्यांना शेतकरीच मतदानाद्वारे उत्तर देतील. यावेळी बाळासाहेब शेळके, प्रकाश वानगर, जितेंद्र साठे, गणेश वानकर, संजय कोळी. डॉ. किरण देशमुख, राजकुमार वाघमारे आदी उपस्थित होते. अत्यंत खालच्या स्तराला जाऊन सहकारमंत्री आरोप करत आहेत. तसेच मी वेडा आणि मला काही कळत नाही असा आव आणून सर्वांना वेड्यात काढण्याचा प्रकार ते करत असल्याचेही दिलीप माने यावेळी म्हणाले. बाजार समितीच्या ठेवी ब्रम्हदेवदादा माने बँकेत असतानाही सहकारमंत्र्यांनी सहकार विभागाच्या अधिकार्‍यांकडून दबाव आणून जवळपास 50 कोटी रुपयांच्या ठेवी काढून त्या कॅनरा बँकेत ठेवल्या तसेच त्याठिकाणाहून आपल्या संस्थांना कोट्यवधी रुपयांची कर्जे उचलली, असा गंभीर आरोपही माने यांनी करत प्रशासकाच्या काळात या ठेवी काढण्यात आल्या.

ठेवीची मुदत संपण्यासाठी काही कालावधी बाकी होता तरीही मुदतीपूर्वी ठेवी काढल्यामुळे दोन टक्के रक्कम बँकेने कपात केली, तर त्याच ठेवी कॅनरा बँकेत 7 टक्के व्याजाने ठेवल्या होत्या. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही त्यानी सांगितले. यासंदर्भात आपणदेखील न्यायालयात जाणार आहोत, असेही माने यांनी सांगितले. आम्हाला प्रचारात सक्रिय होता येऊ नये यासाठी कोर्ट कचेरीत गुंतवून निवडणूक जिंकण्याचा सहकारमंत्र्यांचा डाव होता. मात्र न्यायालयाने आम्हाला न्याय दिला असून जामीन मिळाला आहे. त्यामुळे दोन दिवस का होईना प्रचारासाठी आम्हाला वेळ मिळाला असल्याने न्यायदेवतेच आभार मानतो, असेही माने यांनी याप्रसंगी सांगितले.