Mon, Jun 24, 2019 17:34होमपेज › Solapur › छायाचित्रकारिता म्हणजे देशसेवेचे काम : सुशीलकुमार शिंदे

छायाचित्रकारिता म्हणजे देशसेवेचे काम : सुशीलकुमार शिंदे

Published On: Aug 20 2018 1:39AM | Last Updated: Aug 19 2018 10:41PMसोलापूर : प्रतिनिधी

आपल्या  कौशल्याने जोखीम घेत फोटो काढणारे छायाचित्रकार एकप्रकारे समाजसेवा आणि देशसेवा करीत असतात, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले. 

सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिनानिमित्त हॉटेल सिटी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्मृतिचिन्ह, रोप आणि मानाचा फेटा बांधून छायाचित्रकारांचा   गौरव  रविवारी करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महाराष्ट्र राज्य वृत्तवाहिनी संघाचे प्रदेश अध्यक्ष मनीष केत, काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले की, फोटोग्राफी म्हणजे समाजसेवा आणि राष्ट्रभक्तीचे काम असून बर्‍याचदा मोठ्या कौशल्याने छायाचित्रकार कठीण आणि जोखमीचे काम करतो. फोटोग्राफरने काढलेल्या अशा फोटोमुळेच तपासाला दिशा मिळते, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

यावेळी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबादास करगुळे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष गणेश डोंगरे, मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष गौरव खरात, ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले, तसेच वाईल्ड लाईफ छायाचित्रकार यांच्यासह पत्रकार आणि छायाचित्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार  विजयकुमार राजापुरे यांनी, तर आभारप्रदर्शन नितीन पात्रे यांनी केले.