होमपेज › Solapur › सोलापुरात पेट्रोल नव्वदी ओलांडणार?

सोलापुरात पेट्रोल नव्वदी ओलांडणार?

Published On: Sep 10 2018 1:18AM | Last Updated: Sep 10 2018 1:18AMसोलापूर : प्रतिनिधी

पेट्रोल व डिझेलच्या दरात होणारी वाढ काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. रविवारी पेट्रोल 12 पैशांनी, तर डिझेल 11 पैशांनी महागल्याने आता देशात सर्वात महाग पेट्रोलच्या दरात सोलापूरचा दुसरा क्रमांक लागला आहे. तर पहिल्या क्रमांकावर परभणी जिल्ह्याचा क्रमांक आहे. 

सततच्या दरवाढीने दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे. रविवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात आणखी वाढ झाल्याचे फलक प्रत्येक पेट्रोल पंपावर लावण्यात आले होते. परभणी जिल्ह्यामध्ये ग्राहकांना जवळपास 90 रुपये प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे. त्या खालोखाल सोलापूरचा क्रमांक लागतो.
सोलापुरात पेट्रोल पुन्हा 12 पैशांनी महाग झाले होते, तर डिझेल 11 पैशांनी वाढ झाली. परिणामी रविवारी शहरात सकाळी इंडियन ऑईल कंपनीचे पेट्रोल 88.94, तर भारत पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोलचे दर 88.54 वर पोहचले होते. तर डिझेलचे दर 77.76 असे होते. सोलापुरात विविध कंपन्यांच्या पेट्रोलपंपांवर पेट्रोलचे दर जवळपास 88.54 ते 88.94 पर्यंत आहेत. 31 ऑगस्टपासून आजतागायत सोलापुरात पेट्रोल 1 रुपया 71 पैशांनी महाग झाले आहे. तर डिझेल 4 सप्टेंबरपासून 9 सप्टेंबरपर्यंत 1 रुपया 85 पैशांनी महाग झाले आहे.

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात अमरावती व औरंगाबाद या जिल्ह्यांत पेट्रोलने देशातील सर्वात उच्चांकी दर गाठला होता. हा रेकॉर्ड परभणी जिल्ह्याने मोडीत काढून अमरावती व औरंगाबाद जिल्ह्यांना मागे टाकले आहे. सतत वाढणार्‍या पेट्रोल दरामुळे सोलापूर देशात पहिल्या क्रमांकावर जाते की काय ?, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.