Tue, Mar 26, 2019 11:41होमपेज › Solapur › शहरवासीयांवर कचर्‍याबाबत दंडात्मक कारवाईचा बडगा?

शहरवासीयांवर कचर्‍याबाबत दंडात्मक कारवाईचा बडगा?

Published On: Jun 25 2018 1:53AM | Last Updated: Jun 24 2018 9:40PMसोलापूर ः प्रतिनिधी 

प्लास्टिक बंदी कायद्यांतर्गत प्लास्टिक बाळगणार्‍या शहरवासीयांकडून पाच हजारांचा दंड वसूल करणार्‍या महापालिकेने आता ओला व सुका कचर्‍याचे वर्गीकरण व्यवस्थित केले नाही आणि तो डब्यात टाकला नाही, तर त्यावरही दंडात्मक कारवाईसाठी नियोजन केले आहे; मात्र कचरा वर्गीकरण करण्यासाठी प्रत्येक घरामध्ये डस्टबीन (कचर्‍याचा डबा) देण्याची सोयही स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आली आहे. लवकरच या डस्टबीनचे वाटप केले जाणार असून त्यानंतर कारवाई सत्र हाती घेतले जाणार असल्याची माहिती वरिष्ठस्तरीय अधिकारीवर्गाने दिली आहे. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सोलापूर शहर स्वच्छ राहावे आणि त्याची सवय शहरवासीयांना लागावी यासाठी महापालिकेकडून प्रत्येक घरात दोन डस्टबीन देण्यात येणार आहे. त्यासाठी दोन लाख डस्टबीनची मागणीही करण्यात आली आहे. प्लावीमार या कंपनीकडून टप्प्याटप्याने हे डस्टबीन येणार असून पहिल्या टप्प्यात 24 हजार डस्टबीन सोलापुरात दाखल झाले आहेत. मिळकत कर आणि पाणीपट्टी नियमित भरणार्‍या मिळकतदारांना प्राधान्याने हे डस्टबीन देण्यात येणार आहेत. निळ्या रंगाचे डस्टबीन हे ओल्या कचर्‍यासाठी, तर हिरव्या रंगाचे डस्टबीन सुक्या कचर्‍यासाठी पुरविले जाणार आहेत.

त्यातील कचरा घेऊन जाण्यासाठी रोज महापालिकेची घंटागाडीही येणार आहे. ओला व सुक्या कचर्‍याचे वर्गीकरण नागरिकांनी व्यवस्थित केले नाही तर पहिल्या वेळेस समज देण्यात येईल. मात्र पुन्हा पुन्हा कचरा व्यवस्थित वर्गीकरण केला नाही तर मात्र दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त कामानिमित्त मुंबई येथे गेले असल्याने ते सोलापुरात आल्यावर त्यांच्या आदेशाने या डस्टबीन वितरणाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली आहे.