होमपेज › Solapur › उत्पादनाच्या ब्रँडसाठी स्वत:चे   ‘डोके’ही लावणे गरजेचे 

उत्पादनाच्या ब्रँडसाठी स्वत:चे   ‘डोके’ही लावणे गरजेचे 

Published On: Mar 19 2018 1:49AM | Last Updated: Mar 18 2018 10:37PMसोलापूर : प्रतिनिधी 

कुठलाही उद्योग करताना उत्पादनाची गुणवत्ता, आत्मविश्‍वास व सचोटी या त्रिसूत्रीचा अवलंब केला पाहिजे. आपल्या उत्पादनाचे ब्रँड करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याबरोबरच स्वत:चे डोके अर्थात अक्‍कलही उपयोगात आणावी, या शब्दांत योगगुरू रामदेवबाबा यांनी रविवारी स्थानिक वस्त्रोद्योजकांना टीप्स दिल्या. पतंजली योग समिती सोलापूर शाखा, सारथी फाऊंडेशनच्यावतीने तसेच चेंबर ऑफ कॉमर्स, जिल्हा यंत्रमागधारक संघ, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशन, सोलापूर कापड उत्पादक संघाच्या सहकार्याने रंगभवन येथे आयोजित ववस्त्रोद्योजकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकारमंत्री सुभाष देशमुख होते.

यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश गोसकी, सोलापूर रेडीमेड कापड उत्पादक संघाचे अध्यक्ष रामवल्लभ जाजू, पतंजली योग समितीच्या दक्षिण भारत महिला विभागप्रमुख सुधा अळ्ळीमोरे आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. रामदेवबाबा पुढे म्हणाले, सोलापुरी टॉवेल, चादरसह गारमेंटची उत्पादने पतंजलीच्या ब्रँडखाली विकण्याचा विचार आहे. याकरिता पतंजलीचे टेक्स्टाईलप्रमुख एम.पी. सिंग यांना लवकरच सोलापुरात पाठवून व्हीजन तयार करण्यात येणार आहे. येथील वस्त्रोद्योग, गारमेंटच्या उर्जितावस्थेचे स्वप्न सर्वजण मिळून पूर्ण करू, असे अभिवचन रामदेवबाबा यांनी यावेळी दिले.

चला, सोलापूरचे मार्केटिंग करू या : सहकारमंत्री

याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना सहकारमंत्री देशमुख म्हणाले, दीड वर्षांपूर्वी सोलापूरचे मार्केटिंग करण्याची भूमिका घेतली. मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्रच्या धर्तीवर आपण सर्वजण मेक इन सोलापूरचा संकल्प करू या. रामदेवबाबा  पतंजलीच्या माध्यमातून सोलापूरचे चांगले मार्केटिंग करतील, अशी आशा आहे. येत्या दोन वर्षात वस्त्र उत्पादने, तीर्थक्षेत्राबाबत सोलापूरचे नाव करून गतवैभव परत आणू, अशी साद ना. देशमुख यांनी उपस्थितांना घातली. यावेळी बुरा, राठी, गड्डम तसेच अमित जैन यांनी पतंजलीच्या माध्यमातून सोलापुरातील टेक्स्टाईल, गारमेंट उद्योगाला चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. सूत्रसंचालन धन्यकुमार बिराजदार यांनी केले. यंत्रमागधारक व रेडीमेड उद्योजक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.