होमपेज › Solapur › सोलापुरात ‘पतंजली टेक्स्टाईल’

सोलापुरात ‘पतंजली टेक्स्टाईल’

Published On: Mar 16 2018 11:07PM | Last Updated: Mar 16 2018 11:07PMसोलापूर : प्रतिनिधी

वस्त्रोद्योगातून सोलापूरचा विकास करणार असून यासाठी सोलापुरात पतंजली कंपनीच्या माध्यमातून टेक्स्टाईल उद्योग उभारणार असल्याची घोषणा योगगुरू रामदेव बाबा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

तीनदिवसीय सोलापूर दौर्‍यावर आलेल्या रामदेव बाबा यांनी सोलापुरातील टॉवेल व चादर कारखानदार यांच्याशी चर्चा करून पतंजली उद्योगसमूह सोलापूरच्या टेक्स्टाईल उद्योगात येणार असल्याची ग्वाही दिली. अक्‍कलकोट येथे योग शिबिरास आलेल्या रामदेव बाबा यांनी सोलापुरात शुक्रवारी सायंकाळी अ‍ॅम्फी थिएटर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

भारताच्या विकासासाठी आणखीन मेहनत करणार व 2050 पर्यंत भारताला जगाच्या पातळीवर आर्थिक महासत्ता बनवणार असल्याचे स्वप्न पाहिले आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करणार, असे रामदेव बाबा यांनी सांगितले. पतंजली उद्योगसमूह नॉन प्रॉफिटेबल चॅरिटी समूह आहे, असेही सांगितले.

यापूर्वी नागपुरात पतंजली समुहाने  संत्री उद्योग समुहाची उभारणी केली.ज्यामुळे संत्री उद्योगाला गती प्राप्त झाली. त्याप्रकारचा उद्योगसमूह सोलापुरात आणणार व सोलापूरच्या जनतेला एक प्रकारे रोजगार उपलब्ध करुन देणार, असे रामदेव बाबा यांनी सांगितले.

वळसंग येथे  ग्रामीण जनतेशी संवाद साधत त्यांना योगाचे धडे देणार आहे.मी सुध्दा शेतकरी पुत्र आहे असे रामदेव बाबा म्हणाले. योग हा धर्मनिरपेक्ष आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांनी योगाच्या प्रशिक्षणातून तंदरुस्त शरीर केले. योग हा सर्व रोगांचा औषधी आहे. योगामुळे रोगमुक्‍ती झाली,व्यसनमुक्‍ती झाली पुढे भविष्यात भ्रष्टाचारमुक्‍ती होईल असा विश्‍वास रामदेवबाबांनी दाखविला.या पत्रकार परिषदेत सहकार मंत्री सुभाष देशमुख, विवेकानंद प्रतिष्ठानचे सचिन कल्याणशेट्टी,सुधा अळ्ळीमोरे,सुमनाबाई आदी उपस्थित होते.