Sat, Feb 23, 2019 10:17होमपेज › Solapur › जाणून घ्या, कोठे होणार पासपोर्ट सेवा केंद्र

पंढरपूर, सांगली, सिंधुदुर्गातही पासपोर्ट केंद्रे

Published On: Dec 08 2017 5:46PM | Last Updated: Dec 08 2017 5:46PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर येथे सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा कार्यालयानंतर आता पंढरपूर येथेही  पासपोर्ट कार्यालय सुरू होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी आज ही माहिती दिली. पंढरपूर येथे सुरू होणार्‍या केंद्रामुळे परदेशात जाण्यासाठी इच्छुक असणार्‍यांना तात्काळ पासपोर्ट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या मार्चपर्यंत हे केंद्र सुरू केले जाणार आहे. महाराष्ट्रात जी नवीन १६ पासपोर्ट कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई नॉर्थ सेंट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल, घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव या जिल्ह्यांचा समावेश आहे. या १६ नवीन पासपोर्ट केंद्रांमुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या २७ होणार आहे.

देशातील नागरिकांना सुलभ पद्धतीने पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, येत्या मार्च २०१८ पर्यंत देशात २५१ केंद्रे सुरू होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात २० पासपोर्ट केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातील चार पासपोर्ट केंद्रे सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी- चिंचवड येथे सुरू करण्यात आली आहेत. उर्वरित १६ पासपोर्ट केंद्रे लवकरच कार्यान्वित होतील, अशी माहिती ज्ञानेश्‍वर मुळे यांनी दिली. मार्च २०१८ पर्यंत देशात २५१ नवीन पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू होणार असून महाराष्ट्रात १६ केंद्रे लवकरच सुरू करण्यात येतील, अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे यांनी दिली आहे.