Tue, Apr 23, 2019 05:57होमपेज › Solapur › बदलत्या सोलापूरमध्ये सहभागी व्हा

बदलत्या सोलापूरमध्ये सहभागी व्हा

Published On: Apr 11 2018 1:32AM | Last Updated: Apr 10 2018 8:46PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापुरातून खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचत आहेत. मात्र अजूनही त्यांन हव्या त्या सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे बदलत्या सोलापूरमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन, सोयीसुविधा देण्यासाठी सहभागी व्हा, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूरकरांना केले.

जिल्हा क्रीडासंकुल समितीतर्फे सुंदरमनगर, विजापूर रोड येथे बांधलेल्या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा सोमवारी, 9 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता झाला. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा क्रीडासंकुलाचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, महिला व बालकल्याण समिती सभापती अश्‍विनी चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

 सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते जलतरण तलावाच्या कोनशिलेचे उद्घाटन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. जलतरण तलावात जलअर्पण उपस्थितांच्या हस्ते झाले तसेच हवेत फुगे सोडून लोकार्पण सोहळा झाला.  देशमुख म्हणाले, सोलापुरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होत आहेत. येथील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विजापूर रोड येथे जलतरण तलाव उद्यापासून सुरू होत आहे तसेच इतर क्षेत्रांतील खेळाडूंना विविध सोयीसुविधा कमी प्रमाणात मिळत आहेत. 

त्यासाठी सरकारकडून तर निधी घेऊच, परंतु येथील उद्योजकांचेदेखील सहकार्य घेऊ. यावेळी सहकारमंत्र्यांनी खेळाडूंना विविध सोयीसुविधा वेळेवर मिळत नसल्याने जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडासंकुलावर नाराजी व्यक्त केली.  शेवटी आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी डायव्हिंगचे प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांनी केले. सूत्रसंचालन श्‍वेता हुल्ले यांनी केले. आभार क्रीडाधिकारी अनिल देशपांडे यांनी मानले.
 

Tags : subhash deshmukh, Solapur