पंढरपूर : प्रतिनिधी
काँग्रेसचे जेष्ठ नेते, माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांच्या अस्थींचे आज चंद्रभागेत विधीवत विसर्जन करण्यात आले. दिवंगत आमदार कदम यांचे चिरंजीव विश्वजीत कदम यांच्यासह कदम कुटूंबीयातील सदस्य, काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दिवंगत आमदार कदम यांच्या अस्थींचे विसर्जन चंद्रभागा नदीत करण्याकरिता त्यांच्या अस्थी आज (सोमवार) दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात आणण्यात आल्या. श्री. विठ्ठल मंदिरासमोर संत नामदेव पायरी येथे अस्थी कलशाचे पुजन करण्यात आले. विधीवत पूजन करून अस्थींचे चंद्रभागा नदीत विसर्जन करण्यात आले. यावेळी आमदार कदम यांचे पुत्र विश्वाजीत कदम आणि त्यांच्या कुटूंबीयांपैकी शांताराम कदम, चंद्रशेखर कदम, कुंडलीक गायकवाड, राजेंद्र जगताप आदी आले होते. तर छत्रपती शिवाजी चौकात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.