होमपेज › Solapur › पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचा मुहूर्त हुकणार?

पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याचा मुहूर्त हुकणार?

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 7:54PMपंढरपूर : प्रतिनिधी

कोल्हापूर परिक्षेत्राचे स्पे.आय.जी. विश्‍वास नांगरे - पाटील यांनी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या शुभारंभाचा मुहूर्त 1 मे रोजी असल्याचे जाहीर केले होते. परंतु अद्यापही नूतन पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम अपूर्ण असल्यामुळे 1 मे चा मुहूर्त हुकणार असल्याचे  दिसत आहे. दरम्यान यासंदर्भात सहायक पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 1 मे रोजी नवीन पोलिस ठाणे सुरू करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. परंतु होईल की नाही हे सांगता येणार नाही. 

पंढरपूर तालुक्यातील मोठे कार्यक्षेत्र, वाढते गुन्हे आणि अपुरे पोलिस बळ लक्षात घेता पंढरपूर ग्रामीण हे नूतन पोलिस ठाणे मागील वर्षी मंजूर झालेले आहे. यापूर्वी करकंब विभागासाठी स्वतंत्र करकंब पोलिस ठाणे निर्माण केले असून त्याचे कामकाजही गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. गेल्या वर्षी पंढरपूर ग्रामीण हे नूतन पोलिस ठाणे मंजूर केले असून  त्याकरिता उजनी वसाहतीमध्ये इमारत निश्‍चित करण्यात आलेली आहे. या पोलिस ठाण्यामध्ये वाखरी, भंडिशेगाव, खेडभाळवणी, शिरढोण, कौठाळी, शेळवे, वाडीकुरोली, पिराची कुरोली, भाळवणी, जैनवाडी, पळशी, सुपली, बार्डी, उपरी, गादेगाव, धोंडेवाडी, केसकरवाडी, सोनके, तिसंगी, बोहाळी, कोर्टी, उंबरगाव आदी 24 गावांचा समावेश आहे. 

या पोलिस ठाण्याकरिता 50  पोलिस कर्मचार्‍यांची मंजुरी असून यापूर्वी काही पोलिस कर्मचारी या पोलिस ठाण्यासाठी नियुक्‍त करण्यात आलेले आहेत आणि ते सध्या पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात काम करीत आहे. 19 एप्रिल रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक एस.विरेश प्रभू यांनी आणखी 19 काँस्टेबल आणि 3 सहायक फौजदारांची नियुक्‍ती पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यासाठी केलेली आहे. विशेष म्हणजे पोलिस ठाण्यासाठी कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आलेली आहे. कोल्हापूर परिक्षेत्राच्या स्पे.आय.जीं.नी 1 मे चा शुभारंभाचा मुहूर्त जाहीर केला असला तरी अद्यापही पोलिस ठाण्यासाठी  निरीक्षकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्याचबरोबर या पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम अजूनही अपूर्ण आहे.

बाहेरून रंगरंगोटी , प्रसाधनगृह झालेली असून अंतर्गत फर्निचर, खिडक्यांच्या काचा बसवणे अशी कामे अद्यापही अपूर्ण आहेत. त्यामुळे ही कामे येत्या 9 दिवसांत पुर्ण होणार का याकडे लक्ष लागले आहे. पोलीस निरीक्षकांसह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या नियुक्त्या कोणत्याही क्षणी करता येतील परंतू इमारतीचे आणि पोलीस ठाण्यातील पायाभूत सुविधांचे काम वेळेत पूर्ण होणार का यावरच 1 मे चा मुहूर्त साधला जाणार आहे. अन्यथा आय.जीं नी जाहीर केलेला मुहूर्तही टळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

Tags : Solapur, Pandharpur, rural, police station, start