Wed, Jul 17, 2019 08:19होमपेज › Solapur › शेतकर्‍यांनी केली वीज बिलांची होळी

शेतकर्‍यांनी केली वीज बिलांची होळी

Published On: Dec 14 2017 1:47AM | Last Updated: Dec 13 2017 9:00PM

बुकमार्क करा

पंढरपूर :  प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्री कृषिमंत्री खा. शरद पवार यांनी नागपूर येथे भाजप सरकारवर हल्लाबोल करीत शेतकर्‍यांनी वीज बिल भरू नये असे आवाहन केले आहे. त्यानुसार उपरी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी वीज न भरण्याचा निर्णय घेतला असून वीज बिलांची होळी केली आहे. 

राज्य सरकारला सत्तेवर येऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहे. परंतु अद्यापर्यंत सरकारकडून घोषीत केलेल्या कोणत्याही योजनाचा लाभ प्रत्यक्ष सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचलेला नाही. कर्जमाफी फसवी असल्याचा अनुभव शेतकर्‍यांना येत आहे. उपरी गावामध्ये एकूण 492 शेतकर्‍यांनी कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरले आहेत. परंतु पहिली व दुसरी यादी मिळून फक्त सहा लोकांना कर्ज माफी झाली आहे. अशातच शेती मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. दुधाला दरवाढ मिळत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे सरकारविरोधात गावामध्ये मोठा असंतोष आहे. जनतेच्या मनामधील विश्‍वास गमावलेल्या सरकार विरोधात राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाने असहकार पुकारल्यानंतर व सरकारची देणी कोणीही देऊ नका या शरद पवारांच्या आवाहनाला ग्रामस्थांनी आपला पाठिंबा दिला आहे. बुधवारी सकाळी ग्रामस्थांनी येथील पंढरपूर - सातारा रोडवरील शिवाजी चौकात महावितरण कंपनीच्या वीज बिलांची होळी केली. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवनाथ आसबे,  साहेबराव नागणे,  बाळासाहेब नागणे, राजाभाऊ नागणे, हणमंत नागणे, अशोक नागणे, महेश नागणे, निवास नागणे,  रविंद्र नागणे, धर्मा नागणे, श्रीरंग नागणे, केशव सुरवसे, शंकर नागणे यांच्यासह मोठ्या संख्येने तरुण व शेतकरी उपस्थित होते. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात उपस्थित शेतकर्‍यांकडून जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.