Thu, Nov 22, 2018 01:49



होमपेज › Solapur › पंढरपूर विभाग शिवसेनेत खांदेपालट होणार?

पंढरपूर विभाग शिवसेनेत खांदेपालट होणार?

Published On: Jun 20 2018 1:17AM | Last Updated: Jun 19 2018 9:00PM



पंढरपूर : प्रतिनिधी

आगामी विधानसभा, लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर पंढरपूर विभाग शिवसेनेत मोठी खांदेपालट होण्याची शक्यता असून आ. तानाजी सावंत यांनी पक्षातील जुन्या, निष्ठावंत आणि सक्रिय असलेल्या कार्यकर्त्यांवर मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. या निर्णयास मातोश्रीवरूनही हिरवा झेंडा दाखवण्यात आल्यामुळे लवकरच पंढरपूर विभागातील शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांवर नव्या जबाबदार्‍या टाकल्या जातील असे दिसत आहे. 

लोकसभा तसेच विधानसभा निवडणूका आता एक वर्षावर आलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी सक्रिय झालेली आहेत. त्या तुलनेत पंढरपूर विभागात शिवसेनेत अजूनही शांतता असल्याचे दिसत असून त्यामुळे शिवसैनिकांत अस्वस्थता निर्माण झालेली आहे. दरम्यानच्या काळात जिल्ह्याचे संपर्कप्रमुख म्हणून आ. तानाजी सावंत यांची निवड केल्यानंतर त्यांनी जुन्या आणि निष्क्रीय पदाधिकार्‍यांना हटवून जुन्याच परंतु सक्रिय व निष्ठावान कार्यकर्त्यांवर नव्या पदांची जबाबदारी देण्याचे धोरण आखले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर विभागातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचीही खांदेपालट केली जाणार असल्याचे दिसते. विद्यमान जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांना हटवून त्यांच्याजागी पंढरपूरच्या निष्ठावान शिवसैनिकाची नियुक्ती केले जाईल असे दिसते. 

पंढरपूर तालुक्याचे विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्यादृष्टीने मोठे महत्त्व आहे. कारण हा तालुका 4 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरू शकतो हे लक्षात घेऊन या भागात शिवसेना मजबूत करण्यासाठी पंढरपूर तालुक्याला जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्याचे धोरण सेना नेतृत्वाने अवलंबल्याचे दिसते. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूर तालुक्यात एकहाती शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन पक्षाचे निशाण फडकावत ठेवलेल्या तरूण नेत्याला जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. मातोश्रीकडून या निर्णयाला मान्यता मिळाली असून पक्षाचे वरिष्ठ नेते विश्‍वनाथ नेरूरकर, गजानन किर्तीकर, आ. निलमताई गोर्‍हे यांनीही या बदलास सहमती दर्शवली आहे. येत्या दोन दिवसांत या बदलाची घोषणा केली जाण्याची शक्यता असून पंढरपूर तालुक्याला सेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुखपद मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. जेष्ठ शिवसैनिक साईनाथ अभंगराव यांच्यानंतर दुसर्‍यांदा पंढरपूरकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखपद चालून येत असल्याच्या चर्चेमुळे तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.