Thu, Apr 25, 2019 06:09होमपेज › Solapur › प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने 29 पासून आमरण उपोषण

प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने 29 पासून आमरण उपोषण

Published On: Jan 25 2018 1:00AM | Last Updated: Jan 24 2018 10:38PMपंढरपूर : प्रतिनिधी

कुरूल ( ता.मोहोळ) जि.प. गटातील विविध प्रश्‍न मार्गी लागावेत यासाठी नागरिकांनी आपल्याला ज्या अपेक्षेने निवडून दिले आहे त्या अपेक्षा प्रशासनाकडून पूर्ण होत नाहीत. विविध समस्यांचा आपण प्रशासकीय पातळीवर सातत्याने पाठपुरावा करूनही त्या मार्गी लागत नाहीत. त्यामुळे आपण व्यथित झालो असून 26 जानेवारीपर्यंत मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्‍न मार्गी लागले नाहीत तर आपण इचगाव (ता. मोहोळ) येथील हनुमान मंदिरात  29 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जि. प. सदस्या शैला गोडसे यांनी दिला.

शैला गोडसे या कुरूल जि.प. गटात गेल्या एक वर्षांपासून प्रतिनिधित्व करीत आहेत. अनेक विकास योजनांसाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला असला तरी अनेक समस्या मागणी करूनही सुटत नाहीत. नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा व प्रशासनाचे कामचलाऊ धोरण यामुळे विकास खुंटला आहे. कॅनॉलला पाणी सोडल्यानंतर येणकी येथील गाव तलाव भरून घ्यावा. त्यामुळे ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे. याविषयी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता यांना वेळोवेळी मागणी करूनही त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. 
कुरूल जिल्हा परिषद गटातील कॅनॉलच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यावरील झाडे-झुडपे तोडून ते वाहतुकीस लायक करणे याविषयी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अभियंत्यांकडे मागणी केली आहे. 

कातेवाडी ते कुरूल-सोहाळे पाटी रस्ता दुरूस्ती करणे, वडदेगाव-नळी, वडदेगाव-आंबेचिंचोली रस्त्याचे डांबरीकरण करणे, घोडेश्‍वर-बेगमपूर व कुरूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कायमस्वरूपी 108 रूग्णवाहिका उपलब्ध करणे याशिवाय शिक्षण, आरोग्य, रस्ते, पिण्याच्या पाणीपुरवठा योजना, वीज पुरवठा याविषयीच्या अनेक प्रश्‍नांबाबत त्या त्या विभागाचे अधिकारी, पदाधिकारी यांना वेळोवेळी निवेदने देऊन मागणी केली आहे. म्हणून येत्या 26 जानेवारीपर्यंत मतदारसंघातील आपले विविध प्रश्‍न मार्गी न लागल्यास इचगाव येथील हनुमान मंदिरात आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी दिला आहे. त्यामुळे खळबळ उडाला आहे. जि.प. सदस्य या प्रशासन व नागरिकांमध्ये दुवा आहेत. त्यांचे प्रश्‍न मार्गी लागत नसल्याने स्वत: उपोषण करण्यावर ठाम असल्याने प्रशासनाची गोची झाली आहे.

कुरूल मतदारसंघातील विविध मागण्यांसाठी जि.प.चे अधिकारी, पदाधिकारी, जिल्हाधिकारी, मंत्रिमंडळ स्तरावर आपण निवेदनाद्वारे प्रत्यक्ष भेटून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र आपणाला अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही. भविष्यातही अशिच परिस्थिती राहिल्यास नागरिकांचे प्रश्‍न सुटणार नाहीत. तरीही आपणाला नागरिकांच्या समस्यांचा सामना मात्र करावा लागत आहे. म्हणून आपण आमरण उपोषण करत आहे. प्रशासन जोपर्यंत दखल घेत नाही, तोपर्यंत आपली भूमिका कायम असेल.
सौ.  शैला गोडसे, जि.प. सदस्या, कुरूल गट