होमपेज › Solapur › श्री विठ्ठलाचं सोनं वितळवणार?

श्री विठ्ठलाचं सोनं वितळवणार?

Published On: Mar 21 2018 12:24AM | Last Updated: Mar 21 2018 12:23AM
 पंढरपूर : प्रतिनिधी 

श्री विठ्ठल-रुक्मिणीस दान स्वरूपात आलेले सुमारे 35 किलोपेक्षा जास्त वजनाचे सोन्याचे दागिने वितळवून ठेवण्याचा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती विचार करीत आहे. अनेक प्रकारांत आलेले हे दागिने हाताळणे क्‍लिष्ट झाले आहे. यासंदर्भात मंदिर समितीच्या नित्योपचार समितीची सल्लामसलत करून भाविकांच्या भावनांचा विचार करून निर्णय घेतला जाणार आहे.  श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानाला भाविकांनी गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार विविध प्रकारचे दागिने दान केलेले आहेत. यामध्ये अगदी लहान स्वरूपाच्या तारेपासून ते सोन्याच्या मुकुटापर्यंत विविध प्रकारचे दागिने आहेत. दागिन्यांची सातत्याने मोजदाद करावी लागते, त्याचे वजन करून ते जतन करावे लागत आहेत. 

अनेक वर्षांपासून दिलेले हे दागिने हाताळणे आणि त्यांच्या नोंदी ठेवणे  क्‍लिष्ट झालेले आहेत. हाताळताना या दागिनांची तुट, फुट होऊ लागली आहे. त्यामुळे देवांच्या पारंपारिक आणि महत्वांच्या नित्योपचारातील दागिने वगळता इतर स्वरूपाचे दागिने वितळवून त्याची लगड किंवा विटा करून ठेवण्याचा विचार मंदिर समितीच्या पातळीवर सुरू आहे. 

यासंदर्भात भाविकांच्या भावनांचा विचार करून ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नेतृत्वातील मंदिर समितीच्या नित्योपचार समितीचा सल्ला घेण्यात येणार आहे तसेच विधी व न्याय विभागाची परवानगी घेऊनच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. देशातील अन्य देवस्थांनानी अशा प्रकारे दागिने वितळवून ठेवलेले आहेत. त्या पार्श्‍वभुमीवर विठ्ठल, रुक्मिणीचे दागिने अधिक सुरक्षित करण्यासाठी ते वितळवून ठेवण्याचा विचार चालू असल्याचे समजते. 

श्री विठ्ठल-रुक्मिणीचे अनेक वर्षांपासून भाविकांनी दान दिलेले दागिने विविध प्रकारात असून अगदी लहानात लहान दागिने मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची हाताळणी आणि नोंदी ठेवणे खूपच क्‍लिष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे जे दागिने नित्योपचारात नाहीत असे दागिने वितळवून त्यांच्या लगड किंवा विटा करून सुरक्षित ठेवण्याचा प्रस्ताव समितीसमोर आला आहे. यासंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नसून मंदिर समितीच्या नित्योपचार समितीशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला जाणार आहे. देशातील अन्य देवस्थांनानीही अशा प्रकारे दागिने वितळवून ठेवलेले आहेत. त्याचप्रमाणे विठ्ठलाचे नित्योपचाराशिवाय असलेले दागिनेही वितळवून ठेवण्याचा विचार आहे. मात्र, यावर कुठलाही निर्णय झालेला नाही.
- सचिन ढोले, कार्यकारी अधिकारी, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती
 

Tags :  Pandharpur, Vithal Temple,  Donated Gold, Gold  Melting, Solapur