Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Solapur › मंदिर समितीस एक कोटीचे उत्पन्‍न

मंदिर समितीस एक कोटीचे उत्पन्‍न

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 11:07PMपंढरपूर : प्रतिनिधी

नुकतीच संपन्‍न झालेली माघी यात्रा विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीकरिता चांगलीच फायदेशीर ठरली. मंदिर समितीला यावर्षी एकूण 1 कोटी 10 लाख 38 हजार 829 रुपये इतके अर्थिक उत्पन्‍न मिळाले आहे. तसेच यात्राकाळात तब्बल 2 लाख 19 हजार 113 भाविकांनी पदस्पर्श, तर 1 लाख 45 हजार 771 इतक्या भाविकांनी मुखदर्शन घेतले आहे. 

माघी यात्रा ही पंढरीच्या चार प्रमुख यात्रांपैकी एक असून, तुलनेने या यात्रेला येणार्‍या भाविकांची संख्या सर्वात कमी असते. मात्र, यावर्षी माघीसाठी एकादशीच्या दिवशीच 4 लाखांवर भाविकांनी हजेरी लावली होती. तर एकंदरीत यात्रा काळात 8 लाखांहून अधिक भाविकांनी पंढरीत हजेरी लावली असल्याचा अंदाज आहे. 

आर्थिक उत्पन्‍नाच्या तुलनेत गेल्यावर्षीपेक्षा यंदा मंदिर समितीचे उत्पन्‍न चांगलेच वाढले आहे. गेल्यावर्षी मंदिर समितीला 82 लाख 72 हजार रुपये उत्पन्‍न मिळाले होते, तर यंदा हा आकडा 1 कोटी 10 लाख 38 हजारांवर पोहोचला आहे. यामध्ये सर्वाधिक 41 लाख 53 हजार 270 रुपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत. विठ्ठलाच्या पायावर 15 लाख 50 हजार रुपये, तर रुक्मिणीमातेच्या चरणी 4 लाख 41 हजार 576 रुपये मिळाले आहेत. बुंदी लाडू विक्री 18 लाख 68 हजार 88 रुपये, राजगिरा लाडू विक्री 4 लाख 77 हजार 520, भक्‍तनिवास देणगी 2 लाख 97 हजार 635, परिवार देवता दक्षिणा पेटीतून 4 लाख 17 हजार 276 रुपये मिळाले आहेत. भक्‍तनिवास, फोटो विक्री, हुंडी पेटी, नित्यपूजा, अन्‍नछत्र ठेव पावती अशा मार्गाने एकंदरीत 1 कोटी 10 लाख 38 हजार 829 रुपये उत्पन्‍न मंदिर समितीला मिळाले असून, यात्रा सुरळीत पार पडलेली आहे.