Mon, Aug 19, 2019 09:19होमपेज › Solapur › बंदचा पंढरपूरला 15 कोटींचा फटका

बंदचा पंढरपूरला 15 कोटींचा फटका

Published On: Mar 21 2018 12:24AM | Last Updated: Mar 20 2018 11:54PM पंढरपूर : प्रतिनिधी

नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनापाठोपाठ 5 मिनिटांत पंढरपूर शहरात शटरडाऊनची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे मोटारसायकल,  ट्रॅक्टर, सराफ बाजार, इलेक्ट्रॅानिक्स, कपडे आणि इतर खरेदी-विक्री ठप्प झाल्यामुळे गुढी पाडव्याच्या दिवशी पंढरपूरच्या बाजारपेठेला किमान 15 कोटी रुपयांचा बुक्‍का लागल्याचे व्यापारीवर्गातून सांगितले जाते. दुसर्‍या दिवशीही पंढरपूर बंद राहिल्यामुळे बाजारपेठेवर सुमारे 50 टक्के परिणाम झाल्याचा अंदाज आहे. 

गुढी पाडवा हा मराठी वर्षातील पहिला दिवस असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विविध वस्तू, मोटारसायकली, ट्रॅक्टर, कार, इलेक्ट्रानिक्स वस्तू, सोने-चांदी खरेदी, कपडे, बांधकाम व्यवसायात करोडो रुपयांची अर्थिक उलाढाल होत असते. यावर्षी पंढरपूर तालुक्यातील सर्वच साखर कारखाने चालू आहेत आणि कारखान्यांनी उसाची बिले दिलेली आहेत. डाळिंबाच्या दरात वाढ झाली असून द्राक्षे, बेदाणानिर्मिती आणि विक्री जोमात आहे. यंदा कांद्याला चांगला भाव मिळाल्यामुळे शेतकर्‍यांच्या हातात चांगल्याप्रकारे पैसा आला होता आणि गेल्या दोन महिन्यांत पंढरपूरच्या मार्केटने उचल घेतली होती.

बाजारातील तेजीचा मूड पाहून यावर्षी सर्वच व्यापार्‍यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून करोडो रुपयांचा माल, वस्तू भरून ठेवल्या होत्या. मोठ्या उत्साहात सकाळपासून खरेदी-विक्री सुरूही झाली होती. दुपारी 1 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असतानाच स्टेशन रोडला नगरसेवक संदीप पवार यांची गोळ्या घालून हत्या झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे शहरात पसरले. त्यापाठोपाठ शहरात दहशत पसरून पाच-दहा मिनिटांत सर्व बाजारपेठ ठप्प झाली. एकूणएक दुकाने बंद झाल्यामुळे दुपारनंतरचे सर्व व्यवहार ठप्प झाले. शहरातील लोक घरात जाऊन बसले आणि ग्रामीण भागातील ग्राहक गावाकडे परतले. संपूर्ण बाजारपेठेत ऐन सणासुदीच्या काळात शुकशुकाट निर्माण झाला. यामुळे व्यापार्‍यांवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली. 

शहरातील इलेक्ट्रॉनिक्सची सुमारे 27 दुकाने आहेत. या दुकानांतील सर्व प्रकारच्या वस्तूंची सरासरी 2 कोटी रुपयांची उलाढाल बंद पडल्याचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेत्या दुकानदारांकडून सांगितले जाते. प्रत्येक दुकानदारांची सरासरी 10 लाख रुपयांची विक्री अपेक्षित असताना दुपारनंतर दुकाने बंद ठेवावी लागली. त्यापाठोपाठ शहरातील सराफ व्यापारास या बंदचा मोठा फटका बसला आहे. शहरात लहान-मोठ्या स्वरूपाची 110  सराफ दुकाने आहेत. दरवर्षीच्या गुढी पाडव्याचा विचार केला असता किमान 4 ते 4.5 कोटी रूपयांची उलाढाल अपेक्षित असताना संपूर्ण बाजार ठप्प झाला. अपेक्षेपेक्षा 70 टक्के कमी व्यवसाय झाल्याचे सराफा असो.च्या पदाधिकार्‍यांकडून सांगितले जाते. पंढरपुरातील सराफ व्यावसायिकांचे सुमारे 3  कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

त्याचबरोबर सर्वात मोठी उलाढाल मोटारसायकल विक्रीत होत असते. शहरात होंडा, हिरो, बजाज, टीव्हीएस, रॉयल एनफिल्ड अशा आघाडीच्या कंपन्यांची शोरूम्स आहेत. या शोरूम्सपैकी होंडा, हिरो, बजाज, टीव्हीएसची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते. एकंदरीत 500 मोटारसायकलींची विक्री कमी झाली आहे. यामुळे साडेतीन ते 4 कोटी रुपयांची उलाढाल कमी झाल्याचे मोटारसायकल विक्रेत्यांकडून समजते.  यापाठोपाठ तालुक्यात ट्रॅक्टरची मागणी मोठ्या प्रमाणात असून यंदा शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर खरेदीची  जय्यत तयारी केली होती. सोनालिका, स्वराज, महिंद्रा, न्यू हॉलंड, जॉन डिअर, मॅसी फर्ग्यूसन या कंपन्यांची शोरूम्स पंढरपुरात असून गुढी पाडव्याच्या दिवशी सर्व शोरूम्सची सुमारे 60 ट्रॅक्टर्सची विक्री कमी झाल्याने ट्रॅक्टर वितरकांचे 3 कोटी रूपयांपेक्षा जास्तीचे नुकसान झाले होते.  याशिवाय सायकल, कपडे, शेती उपयोगी औजारे यांचीही विक्री ठप्प झाल्यामुळे एकूण पंढरपुरातील बाजारपेठेचे गुढी पाडव्याच्या दिवशी किमान 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त  नुकसान झालेले आहे. 

याशिवाय सोमवार हा आठवड्यातील कामकाजाचा पहिला दिवस असतानाही सोमवारी दहशतीमुळे लोकांनी दुकाने उघडली नाहीत. शहरात चहा आणि पिण्यास पाणी मिळणे मुश्किल झाले होते. प्रासादिक वस्तू, हॉटेल्सही बंद राहिल्यामुळे दुसर्‍या दिवसाचे नुकसान आणखी वेगळे आहे. एका खुनामुळे पंढरपूरकरांना सुमारे 15 कोटी रूपयांचा बुक्‍का लागल्याचा हिशोब आता व्यापारीवर्गातून केला जात आहे. हे नुकसान भरून काढण्याकरिता आता ग्राहकांची प्रतीक्षा करीत बसावे लागणार आहे.