Wed, Nov 13, 2019 13:07होमपेज › Solapur › आता पंढरपूर शहर भाजपातही दुफळी

आता पंढरपूर शहर भाजपातही दुफळी

Published On: Dec 20 2017 1:47AM | Last Updated: Dec 19 2017 10:00PM

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील भाजपमध्ये दोन देशमुखांमध्ये झालेली विभागणी चर्चेचा विषय असतानाच पंढरपूर शहरातील भाजपातही दुफळी माजली असून निष्ठावंतांमध्येच ही विभागणी झाल्यामुळे शहर भाजपची विशेष चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शहर भाजप दुफळी आणि इतर कार्यक्रमांमुळे चर्चेत आलेली असतानाच ग्रामीण भागातील भाजप मात्र अजूनही सुप्तावस्थेतच आहे असे दिसते. 

पंढरपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद अतिशय कमी प्रमाणात होती. गेल्या 3 वर्षांत केंद्र आणि राज्यात सत्तास्थानी असूनही शहर आणि तालुक्यात भाजपला अपेक्षेनुसार बळकटी मिळाल्याचे दिसून आले नाही. राष्ट्रवादीतील परिचारक गट भाजपच्या प्रेमात पडल्यानंतर शहर आणि तालुक्यातील भाजपला ‘अच्छे दिन’ येतील असे मानले जात होते. नगरपालिका, तालुका पंचायत, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर परिचारक गटाचे उमेदवार निवडूनही आले. परंतु परिचारक गटाने  भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला नसल्यामुळे भाजपच्या वाढीला मर्यादा आल्या होत्या आणि निवडणुकीतील यश हे परिचारकांच्या बुस्टर डोसमुळे आलेले उसने अवसान असल्याचे मानले जाऊ लागले होते. 

दरम्यानच्या काळात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे समर्थक संजय वाईकर यांची शहर भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी शहर भाजपला ताकद देण्यासाठी वेगाने काम सुरू केले. त्यामुळे आम्हीच निष्ठावान असे म्हणत एरवी मांडीवर मांडी टाकून बसणार्‍या पारंपरिक भाजपेयींनाही चेव आला आणि त्यांनी आम्हीच खरे निष्ठावान भाजपेयी असल्याचे सांगत गुलाल उधळण्यास सुरूवात केली आहे. हे दोन्ही गट तसे परंपरागत भाजपचेच आहेत. परंतु त्यांच्यामध्ये आता जिल्हा पातळीवर सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख, तर स्थानिक पातळीवर परिचारक समर्थक आणि परिचारक विरोधक अशी दुफळी झाली आहे. ही दुफळी आणि किती रूंदावणार की भविष्यात एक होणार, याकडे आता पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.