Tue, Jul 23, 2019 04:17होमपेज › Solapur › पालखी सोहळा 10 दिवसांवर; यात्रेसाठी प्रशासनाची लगबग

पालखी सोहळा 10 दिवसांवर; यात्रेसाठी प्रशासनाची लगबग

Published On: Jul 11 2018 1:39AM | Last Updated: Jul 11 2018 12:09AMपंढरपूर : प्रतिनिधी 

10 दिवसांवर येऊन ठेपलेल्या आषाढी यात्रेच्या कामांना आता प्रचंड वेग आला असून प्रशासकीय पातळीवर यात्रेच्या कामाची लगीनघाई सुरू झाल्याचे दिसत आहे. 

वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा भक्तीचा सोहळा म्हणून आषाढी एकादशी साजरी केली आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने देहू, आळंदीसह राज्याच्या विविध भागातून शेकडो संतांच्या पालख्या पंढरीकडे निघाल्या आहेत. लाखो वारकर्‍यांची मांदियाळी पंढरीत 23 जुलै रोजी जमणार असल्यामुळे भाविकांना सर्व त्या मुलभूत सुविधा पुरवण्याकामी पंढरपूर नगरपालिका, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पालखी मार्गावरील सर्व ग्रामपंचायती, तालुका आरोग्य विभाग, सामान्य रूग्णालय, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे प्रशासन, वीज वितरण कंपनी प्रशासन कामाला लागले आहे. गेल्या महिन्याभरापासून पुणे, पंढरपूर येथे विविध पातळीवरील बैठका झाल्यानंतर यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे आणि आता त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष करण्यात येत आहे. 

वारकर्‍यांना पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षितता, वीज आणि सुलभ विठ्ठल दर्शन मिळावे याकरिता सर्वच पातळ्यांवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. नगरपालिकेने शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी किंवा जी पूर्ण होऊ शकत नाहीत, ती कामे थांबवून रस्ते रहदारीस योग्य बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पिण्याचे पाणी, शहरातील पथदिवे, शौचालय व्यवस्था उभा करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी शहर आणि तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना यात्रा नियोजनानुसार कामे पार पाडण्यास सूचना केल्या आहेत. 

पोलिस प्रशासनही शहरातील वाहतूक व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन जास्तीचा बंदोबस्त मागवत आहे. या पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या निवासव्यवस्थेचे नियोजन केले जात आहे. मंदिर समिती प्रशासनाने यात्रेच्या काळात जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन मिळावे याकरिता दर्शन रांगेत सर्व सुविधा देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दर्शनरांगेत जास्तीचे तात्पुरते शेडस् उभा केले आहेत आणि सुमारे 4 कि.मी.चे लाकडी बॅरेकेटिंग उभा केले आहेत. 

भाविकांना श्री विठ्ठलाचे लाडू प्रसाद मिळावा म्हणून 10 लाखांवर बुंदी लाडुची निर्मिती सुरू केली आहे. दर्शनरांगेत भाविकांना पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, एकादशीच्या दिवशी उपवासाची खिचडी पुरवण्याचे नियोजन केले जात आहे. सुमारे 15 लाख भाविका यात्रेला येतील, असे गृहित धरून अत्यावश्यक आरोग्य सुविधांसह जागोजागी रूग्णवाहिका, वाढीव बेडस्, तात्पुरते कॉलरा रूग्णालय सुरू करण्यात येत आहे. उपजिल्हा रूग्णालयातून यात्रेनिमित्त जास्तीचा औषध साठा मागवण्यात आल्याचेही प्रशासनाच्यावतीने कळवण्यात आलेले आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना अद्यापही यात्रा अनुदान मिळाले नसले तरी ऊसनवारी करून ग्रामपंचायतींनी यात्रेच्या कामांना गती दिलेली आहे. 

संतांच्या पालख्यांचे 17 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होत असून त्यानंतर पंढरपुरात भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच तालुक्यात 20 जुलै रोजी पालख्यांचे आगमन होत असून तयारीसाठी आता जेमतेम 10 दिवस शिल्लक राहिल्यामुळे सगळी प्रशासकीय यंत्रणा आता केवळ आषाढी यात्रेच्या कामाला लागल्याचे दिसत आहे.